Abhijit Deepke’s scathing criticism of Prime Minister Modi : मुंबईत झालेल्या आंदोलनात कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. महात्मा गांधी यांच्या विचारांचा दाखला देत आपल्या अधिकारांसाठी लढणं आणि आंदोलन करणं हेच गांधीजींना खरं वंदन असल्याचं त्यांनी म्हटलं. यावेळी सरकारवर टीका करताना दीपके म्हणाले, दिल्लीत मुलांना मारणारे जनरल डायर, सरकार बिनकामाचं आणि चोर, लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज, आंदोलनाद्वारे गांधीजींना सर्वात मोठी श्रद्धांजली, आपल्या धिकारांसाठी लढणं हेच गांधीजींना खरं वंदन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काही विधानांचा उल्लेख करत दीपके यांनी त्यांच्यावरही जोरदार शब्दांत टीका केली. एक महाभाग स्वतःला नॉन बायोलॉजिकल म्हणतो, आम्हाला माहितीये तुम्ही माणूसच नाहीत, गांधी, नेहरू आणि आंबेडकरांशी तुलना करण्याची तुमची लायकी नाही, गांधी कभी मरते नाही, हा देश गांधीजींच्या विचारांचा, असं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करताना दीपके यांनी मोदी यांच्या परदेश दौऱ्यांपासून ते सर्वसामान्य नागरिकांना विविध कामांसाठी रांगेत उभं राहावं लागत असल्याच्या मुद्द्यावरून टीका केली.
१२ वर्षे सरकारमध्ये आहेत काम न करता फक्त जग फिरतोय हा माणूस, स्वतः काम करण्याऐवजी जनतेला कामाला लावलय. सगळीकडे जनतेला लाईनमध्ये उभं केलं आहे याने. कायम एकाच सांगत असतात मी चहा विकत होतो. मी फकीर माणूस आहे झोळी घेऊन निघून जाईल, काही असं पंतप्रधान नेहमी सांगत असतात. पण तो झोळी कोणती असेल हे सांगत नाहीत. ती झोळी होती खुर्चीची. पण काहीही म्हणा भाईला काही येवो अगर न येवो फॅशन सेन्स जबरदस्त आहे, अशी टीका त्यांनी केली.
ऑक्टोबरपासून निष्क्रिय रेशन कार्डांवर कारवाई, ई-केवायसी नसेल तर कार्ड बंद होण्याची शक्यता
तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःच व्हिक्टिम असल्याचा दावा करत दीपके यांनी काही घटनांवरून सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. या देशात दुसरे कोणी व्हिक्टीम नाहीत तर मोदी हे स्वतःच व्हिक्टिम आहेत. काही अपशब्द वापरले म्हणून 15 वर्षासारख्या मुलीमागे पंतप्रधानांकडून पूर्ण पोलीस फोर्स लावली जाते. मोदी हे भयंकर आत्मकेंद्रित आहे, असंही दीपके म्हणाले.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आंदोलन आणि तुरुंगवासाच्या मुद्द्यावरून इशारा दिला. तुम्ही म्हणाला होता प्रोटेस्टला जात असाल तर 3 दिवस तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा. आम्हाला तीन दिवस नाही तीन महिने जेलमध्ये ठेवा. मात्र जेलमधून बाहेर आल्यानंतर मी एकच गोष्ट म्हणेल मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन, असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान, गांधीजींच्या विचारांचा दाखला देत लोकशाही आणि नागरिकांच्या अधिकारांसाठी आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका अभिजित दीपके यांनी यावेळी मांडली. त्यांच्या या आक्रमक वक्तव्यांवर सत्ताधारी पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
