गणेश विसर्जनासाठी अहिल्यानगर पोलीस सज्ज, 504 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, शहरावर सीसीटीव्हीची नजर

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर उपविभागात ही तयारी करण्यात आली आहे.

Untitled Design   2026 09 23T191136.798

Untitled Design 2026 09 23T191136.798

Ahilyanagar Police geared up for Ganesh Visarjan : श्री गणेशोत्सव 2026 आणि गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व सुव्यवस्थित पार पडावी, यासाठी अहिल्यानगर शहर पोलीस प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईपासून ते संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्तापर्यंत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर उपविभागात ही तयारी करण्यात आली आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर उपविभागात एकूण 504 जणांवर विविध प्रकारची प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. यामध्ये शांतता आणि कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी 409 जणांकडून बंधपत्र घेण्यात आले आहे. अवैध दारूविक्रीशी संबंधित 21 जणांचे बॉण्ड घेण्यात आले असून, पाच जणांवर जिल्ह्यातून हद्दपारीची अर्थात तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. उत्सवाच्या काळात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे.

गणेशोत्सवाच्या काळात वेगवेगळ्या समाजघटकांमध्ये समन्वय राहावा आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही वाद निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने बैठकींचेही आयोजन केले आहे. शांतता समिती, मोहल्ला समिती, सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी, वाद्यधारक, मूर्तीकार तसेच फ्लेक्स तयार करणाऱ्या व्यावसायिकांसोबत आतापर्यंत एकूण 63 बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकांमध्ये गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीदरम्यान पाळावयाच्या नियमांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

अमेरिकेसोबत संघर्ष सुरू असतानाच इराणचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेत, न्यूयॉर्कमधून पेजेश्कियान काय बोलणार?

विसर्जनाच्या दिवशी शहरातील प्रमुख मिरवणूक मार्ग, चौक आणि गर्दीच्या ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण शहरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. संशयास्पद हालचाली किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणारा प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांना तातडीने कारवाई करता यावी, यासाठी नियंत्रण यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे.

पोलीस प्रशासनाने यापूर्वीच शहर उपविभागात कॉम्बिंग ऑपरेशन राबवले आहे. त्याचबरोबर संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी दंगाकाबू योजना, रूट मार्च आणि मॉब ड्रिलही घेण्यात आली आहे. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर पोलिसांची उपस्थिती वाढवण्यात येणार आहे.

विसर्जन मिरवणूक आणि विसर्जन स्थळांवर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये 71 पोलीस अधिकारी, 669 पोलीस अंमलदार आणि 135 होमगार्डचा समावेश आहे. याशिवाय दोन आरसीपी प्लाटून आणि दोन एसआरपी प्लाटूनही तैनात करण्यात येणार आहेत. विशेषतः संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागात अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

भाजपची देशभरात प्रभारींची नवीन टीम; विनोद तावडे, मेधा कुलकर्णींकडं मोठ्या राज्याची जबाबदारी

गणेश विसर्जनाच्या काळात मोठ्या प्रमाणावर भाविक रस्त्यावर येत असल्याने मिरवणूक मार्गांवरील गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेवरही पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. गणेश मंडळांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि कोणत्याही अफवा किंवा प्रक्षोभक प्रकारांना बळी पडू नये, यासाठीही जनजागृतीवर भर देण्यात आला आहे.

ही संपूर्ण कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य, भिंगार कॅम्पच्या सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्यासह संबंधित पोलीस ठाण्यांतील अधिकारी आणि अंमलदारांनी केली आहे.

एकूणच गणेश विसर्जन मिरवणूक निर्विघ्न आणि शांततेत पार पाडण्यासाठी अहिल्यानगर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई, सीसीटीव्ही सर्वेक्षण, कॉम्बिंग ऑपरेशन, रूट मार्च आणि मोठ्या पोलीस बंदोबस्ताची तयारी केली आहे. नागरिक आणि गणेश मंडळांनीही पोलिसांना सहकार्य करून उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version