Fadnavis’s response to Supriya Sule’s claim : पुण्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान भाजपकडून स्पाय कॅमेऱ्याचा वापर होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. मतदानाची गोपनीयता धोक्यात आणून मतदारांना पैसे दिले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्याचा दावा देखील त्यांनी केला. या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत संबंधित स्पाय कॅमेऱ्याची माहिती आपल्याकडे पाठवण्याचे आवाहन केले असून, त्याववर योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.
शुक्रवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर भाष्य केले. सुप्रिया ताईंनी संबंधित स्पाय कॅमेऱ्याची माहिती माझ्याकडे पाठवावी. तो पेन कसा असतो, हे समजून घेईन. नेमकं काय चाललं आहे, याची माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत स्पाय कॅमेरा असलेल्या पेनचा वापर करून मतदानाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले जात असल्याच्या तक्रारी मतदारांकडून येत असल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केला. भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याचा व्हिडिओ दाखवल्यानंतर ठरलेले पैसे दिले जात असल्याचे मतदार सांगत असल्याचेही त्यांनी म्हटले.
या प्रकाराची निवडणूक आयोग आणि शासनाने तातडीने दखल घेऊन सखोल चौकशी करावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुळे यांनी केली. मतदानाची गोपनीयता आणि मतदारांचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. मात्र, स्पाय कॅमेऱ्याचा वापर आणि पैसेवाटपाबाबतचे हे आरोप अद्याप स्वतंत्रपणे सिद्ध झाल्याची माहिती उपलब्ध नाही.
प्रेयसीला गर्भवती करून सोडू नका, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचा तरुणांना सल्ला
नागपूरमध्ये मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. नागपूर पदवीधर, अमरावती, पुणे शिक्षक, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे पदवीधर या पाच मतदारसंघांतील मतदान प्रक्रियेबाबत त्यांनी विश्वास व्यक्त केला. यावेळी मनोज जरांगे यांनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपवरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. संबंधित संभाषणाची फॉरेन्सिक तपासणी केली जाईल, असे आश्वासन शिवसेनेच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाला दिल्याचे त्यांनी सांगितले.
अडीच वर्षांनंतर हे संभाषण बाहेर येण्यामागचा हेतू काय? कोणाला लक्ष्य केले जात आहे आणि कशासाठी? असे प्रश्न उपस्थित करत या प्रकरणातील सत्य समोर आणले जाईल, असे फडणवीस म्हणाले. मनोज जरांगे, भाजप आणि शिवसेना या सर्वांकडून चौकशीची मागणी होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, पुण्यातील निवडणुकीत स्पाय कॅमेऱ्याच्या वापराबाबत करण्यात आलेले आरोप, त्यासंदर्भातील पुरावे आणि प्रशासनाकडून होणारी संभाव्य चौकशी याकडे आता लक्ष लागले आहे.
