विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी दिल्लीत एल्गार; 5 तारखेला मोठं आंदोलन करणार, अभिजीत दीपकेंची घोषणा

देशातील जवळपास प्रत्येक राज्यात विविध प्रश्नांवर आंदोलने सुरू असून विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष असल्याचेही त्यांनी म्हटले.

Untitled Design   2026 08 31T084739.696

Untitled Design 2026 08 31T084739.696

Announcement by Abhijit Deepak : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी येत्या 5 तारखेला दिल्लीत मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासह विविध मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे नाइलाजाने पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे दीपके यांनी म्हटले आहे. यापूर्वी जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनापेक्षाही यावेळचे आंदोलन मोठे असेल, असा दावाही त्यांनी केला.

विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकार न्यायालयाचे कारण पुढे करत असल्याचा आरोप दीपके यांनी केला. सरकारकडून न्यायालयामुळे यासंदर्भात निर्णय घेता येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, न्यायालयाने आम्ही तयार आहोत, सरकारने केवळ यादी द्यावी, अशी भूमिका घेतली आहे. तरीदेखील सरकारकडून ही यादी दिली जात नसल्याचा दावा दीपके यांनी केला. सध्या आदिवासी विद्यार्थीही आंदोलनाला बसले आहेत. देशातील जवळपास प्रत्येक राज्यात विविध प्रश्नांवर आंदोलने सुरू असून विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष असल्याचेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, बॉम्बे हायकोर्टाची क्लार्क पदासाठी घेण्यात आलेली टायपिंग टेस्ट रद्द करण्यात आल्याच्या निर्णयावरही दीपके यांनी प्रतिक्रिया दिली. संबंधित परीक्षा सुरू असताना काही केंद्रांवर की-बोर्डसह तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. ही मागणी आता मान्य झाली असल्याचे दीपके यांनी सांगितले. यापुढे होणाऱ्या परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रांवर अशा प्रकारच्या तांत्रिक समस्या आढळून आल्या आहेत, त्या केंद्रांवर पुन्हा परीक्षा घेण्यात येऊ नयेत, अशी मागणीही त्यांनी केली.

नेपाळ-चीन सीमेवर महाप्रलय; कस्टम-इमिग्रेशन इमारत ढिगाऱ्याखाली, मुंबईतील 60 पर्यटक बेपत्ता

सोनम वांगचुक यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता दीपके यांनी त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचे म्हटले. “मला वाटते तुम्ही त्यांचा पूर्ण व्हिडिओ पाहिलेला नाही. त्यांनी पाहिलेल्या राजकीय नेत्यांपेक्षा ही मुले खूप चांगली असल्याचे ते म्हणाले आहेत. त्यांच्या बोलण्यात मला अद्याप काहीही चुकीचे वाटले नाही. पूर्ण व्हिडिओमध्ये त्यांनी ही मुले चांगली आणि शिकलेली असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पाहायला हवा. सोनम वांगचुक यांनी अविश्वास कुठे दाखवला, हे मला तरी दिसले नाही. उलट सध्या राजकारणात असलेल्या अपराधी प्रवृत्तीच्या लोकांपेक्षा ही मुले चांगली आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मी त्या वक्तव्याचे वाईट का वाटून घेऊ?” अशी भूमिका दीपके यांनी मांडली.

यावेळी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आपण लवकरच भेट घेणार असल्याचेही अभिजीत दीपके यांनी स्पष्ट केले. मनोज जरांगे पाटील चुकीची मागणी करत नसून मराठा समाजातील मुलांसाठी शिक्षण आणि रोजगाराचा अधिकार मागत आहेत, असे दीपके म्हणाले. शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नांवर सरकार अपेक्षित काम करण्यात अपयशी ठरल्यामुळे अशा मागण्या करण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी नमूद केले. “मनोज जरांगे पाटील यांना मी नक्की भेटणार आहे. ते दिल्लीपर्यंत आले होते, तर मी त्यांना भेटण्यासाठी इथपर्यंत नक्कीच जाऊ शकतो. त्यामुळे जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे,” असे अभिजीत दीपके यांनी सांगितले.

Exit mobile version