Ashish Shelar on Election Controversy : पुण्यात निवडणूक प्रक्रियेवरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. निवडणुका म्हटलं की मतदार, मतदार यंत्रणा आणि निकाल या तीन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. देशातील गेल्या 75 वर्षांतील निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेण्याची गरज असल्याचे शेलार यांनी सांगितले. तसेच निवडणूक व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांची भूमिका ढोंगीपणाची असल्याचा घणाघातही त्यांनी केला. ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक विजय चोरमारे लिखीत ‘गाथा भारतीय निवडणुकांची’ या पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, स्वाभिमानी शेतकरी संघटेचे राजू शेट्टी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेणाऱ्या विरोधकांना जुन्या निवडणुकांमधील कथित घोळांची आठवण करून देत शेलार यांनी सवाल उपस्थित केला. यापूर्वी अनेक निवडणुकांमध्ये चुका आणि गैरप्रकार झाल्याचे आरोप झाले, मात्र त्यावेळी आजचे विरोधक गप्प का होते, असा प्रश्न त्यांनी विचारला. आम्ही विरोधी पक्षात असतानाही निवडणूक व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित न करता निवडणुका लढवत राहिलो, असे सांगत देशात एवढी मोठी निवडणूक यंत्रणा उभी राहणे हे तत्कालीन राजकीय नेतृत्वाचे यश असल्याचे त्यांनी नमूद केले. मतदार हुशार असून त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास असल्याचेही ते म्हणाले.
पुस्तक फाडण्याच्या प्रकारावरही आशिष शेलार यांनी स्पष्ट भूमिका मांडली. पुस्तक फाडणे आपल्याला कधीच मान्य नसल्याचे सांगत आपण कधीही कोणतेही पुस्तक फाडले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांनी घेतलेला निर्णयही आपण कधी फाडला नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान, पुस्तकातील पक्ष आणि खासदारांच्या संख्येबाबतच्या निकषाचा संदर्भ देत त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांबाबत विरोधकांना सवाल केला. ज्या पक्षाचे खासदार जास्त, तोच पक्ष असा निकष असेल, तर तो शिंदे आणि अजित पवार यांच्या बाबतीत लागू का होत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
इंदिरा गांधी यांच्या काळात काँग्रेसमध्ये फूट पडली होती, त्यावेळी इंदिरा गांधी यांच्याच गटाला काँग्रेस मानण्यात आले आणि पक्षाचे चिन्ह म्हणून पंजा मिळाला, याची आठवण शेलार यांनी करून दिली. त्यावेळी विरोधकांना हा निकष समजला नव्हता का, असा सवाल करत आज एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बाबतीत वेगळी भूमिका का घेतली जात आहे, असे त्यांनी विचारले. पक्ष आणि चिन्ह मिळवण्याचा प्रकार त्यावेळीही सुरू होता, असे मत व्यक्त करत शेलार यांनी विरोधकांच्या भूमिकेवर निशाणा साधला.
