Big update for ladaki bahin : राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या पात्र महिलांच्या बँक खात्यात लवकरच 1 हजार 500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. मंत्रालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 24 सप्टेंबरनंतर ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू होऊ शकते. मात्र, ही संभाव्य तारीख असून याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसल्याने निश्चित तारखेसाठी शासनाच्या घोषणेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचे 1 हजार 500 रुपये टप्प्याटप्प्याने जमा केले जाण्याची शक्यता आहे. गणपती विसर्जनाच्या आसपास निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होऊ शकते. त्यामुळे सणासुदीच्या काळात लाभार्थी महिलांना आर्थिक मदत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकाच दिवशी सर्व लाभार्थींच्या खात्यात पैसे जमा होण्याऐवजी ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होऊ शकते.
हवामान विभागाचा अंदाज चुकला? मुंबई-पुण्यासह राज्याच्या अनेक भागांत जोरदार पावसाची हजेरी
ऑगस्ट महिन्याचा हप्ता यापूर्वीच जमा होईल, अशी लाभार्थी महिलांना अपेक्षा होती. मात्र, काही तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रियांमुळे निधी वितरणाला विलंब झाल्याचे सांगितले जात आहे. आता निधी वितरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर येत असून पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण अर्थात डीबीटीच्या माध्यमातून रक्कम जमा केली जाणार आहे.
ई-केवायसी प्रक्रियेनंतर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील पात्र लाभार्थी महिलांची संख्या सुमारे 1 कोटी 66 लाख असल्याची माहिती समोर आली आहे. या पात्र महिलांना योजनेअंतर्गत दरमहा 1 हजार 500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट लाभार्थींच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येते.
यापूर्वी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्याचा हप्ता पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याच्या 1 हजार 500 रुपयांच्या हप्त्याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे. 24 सप्टेंबरनंतर हप्ता वितरणाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी शासनाकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच पैसे नेमके कोणत्या तारखेपासून आणि किती टप्प्यांत जमा केले जाणार, याबाबत स्पष्टता येणार आहे.
