Chief Minister’s appeal to the youth : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी सोमवारी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन करत राज्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. पावसाच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगत त्यांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला. मुख्यमंत्री म्हणाले की, दुपारनंतर अनेक भागांत ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे झाडे कोसळणे, वीजपुरवठा खंडित होणे किंवा इतर दुर्घटना घडू शकतात.
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय प्रवास करू नये. तसेच प्रशासनाने जारी केलेल्या सूचना आणि सतर्कतेच्या निर्देशांचे पालन… pic.twitter.com/7BT4JJxoaj
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 6, 2026
नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच तरुणांनी पर्यटनासाठी धबधबे, घाट परिसर किंवा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्य सरकारने संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन पूर्वतयारी केल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांत दुर्घटना होण्याची शक्यता असलेल्या भागांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “कोणत्याही परिस्थितीत सरकारी यंत्रणा कमी पडणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. गेल्या काही दिवसांत घडलेल्या दुर्घटनांबाबत आवश्यक कारवाई करण्यात आली असून यंत्रणांनी पावसापूर्वीच तयारी केली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. राजकीय आरोप-प्रत्यारोपांपेक्षा जीवितहानीकडे संवेदनशीलतेने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
मानखुर्द येथील दुर्घटनेचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले की, इमारतीचा काही भाग शेजारच्या झोपडपट्टीवर कोसळल्याने नागरिकांचा मृत्यू झाला. तसेच मुंबई-पुणे मार्गावरील दरड कोसळण्याच्या घटनांचा संदर्भ देत त्यांनी बदलत्या हवामानाचा परिणाम अधोरेखित केला. प्रशासनाने तयारी केली असली तरी निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे काही घटना घडत असल्याचे त्यांनी सांगितले.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणीला महापूर; भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने नदीकाठचा परिसर सील केला
राज्यातील सर्व यंत्रणा सतर्क असून अनेक ठिकाणी पाणी साचणे आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबई-पुणे मार्गावरील दरड कोसळल्यानंतर तात्काळ वाहतूक बंद करून पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली. प्रवासात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे गंतव्यस्थानी पोहोचविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
बांधकाम स्थळांसाठी महापालिकेच्या विशेष सुरक्षा सूचना
दरम्यान, सध्याच्या प्रतिकूल हवामानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने सर्व विकासक, कंत्राटदार, वास्तुविशारद आणि प्रकल्प व्यवस्थापकांना विशेष सुरक्षा मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महापालिकेने बांधकाम स्थळांवरील मचान, क्रेन, संरक्षण भिंती, पत्रे, साचाबांधणी आणि इतर तात्पुरत्या संरचनांची तातडीने तपासणी करून त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. इमारतींच्या गच्चीवर किंवा उंच ठिकाणी ठेवलेले सुटे साहित्य हटविणे किंवा सुरक्षितपणे बांधून ठेवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच खोदकाम सुरू असलेल्या ठिकाणी विशेष सुरक्षा उपाययोजना राबविणे, टॉवर क्रेन आणि बांधकाम लिफ्टची तपासणी करणे, तसेच प्रतिकूल हवामानात उंचावरील आणि उचलण्याची सर्व कामे तात्काळ थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व कामगारांनी वैयक्तिक सुरक्षा साधनांचा वापर करणे बंधनकारक असून संपूर्ण बांधकाम स्थळाची सुरक्षा तपासणी करून धोकादायक बाबी त्वरित दूर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हवामान परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
महापालिकेने कामगार, स्थानिक रहिवासी आणि सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्याची बाब असल्याचे स्पष्ट करत सर्व संबंधितांनी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे म्हटले आहे.
