मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील (Jarange) यांनी शनिवार, 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून मराठा समाजाचा पाठिंबा मिळत असून, विविध भागांतून आंदोलक आणि समाजबांधव अंतरवाली सराटीकडे दाखल होत आहेत. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी जरांगे यांनी सरकारला स्पष्ट इशारा देत मागण्यांवर निर्णय न झाल्यास मुंबईकडे कूच करण्याची भूमिका मांडली. सरकारच्या निर्णयासाठी 12 सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करणार असल्याचंही त्यांनी सांगितले.
दरम्यान, अंतरवाली सराटीतील आंदोलनाची धार वाढत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. नागपूर दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी सांगितलं की, आंदोलनस्थळी सरकारचे प्रतिनिधी उपस्थित असून ते जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार आहेत. यापूर्वीही सरकारने चर्चेतून मार्ग काढला आहे आणि यापुढंही तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मनोज जरांगे यांच्या मागण्यांबाबत सरकारने चर्चेची भूमिका कायम ठेवली आहे. ज्या मागण्या कायद्याच्या चौकटीत, संविधानानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं उल्लंघन न करणाऱ्या असतील, त्यावर सरकार चर्चा करण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुरुवातीपासूनच या प्रश्नावर संवेदनशीलतेने काम करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. त्यामुळं सरकार आणि आंदोलकांमधील चर्चेतून तोडगा निघण्याची शक्यता कायम आहे.
दुसरीकडं, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही सरकारकडून सकारात्मक प्रयत्न सुरू असल्याचं सांगितले. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधत असल्याची माहिती त्यांनी दिली. जरांगे यांच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक असून येत्या एक-दोन दिवसांत या प्रकरणावर तोडगा निघू शकतो, असा विश्वास भरणे यांनी व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर परभणीत होणाऱ्या शिवसेना खासदार बंडू जाधव यांच्या शेतकरी मेळाव्यावरूनही वातावरण तापले आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहू नये, तसेच कार्यक्रम रद्द करावा, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. मात्र, जरांगे यांच्या आवाहनानंतरही बंडू जाधव कार्यक्रम घेण्यावर ठाम आहेत. त्यातच एकनाथ शिंदे मुंबईहून परभणीच्या दिशेने रवाना झाले असून ते विमानाने नांदेड येथे पोहोचणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, शिंदे सेनेकडून बच्चू कडू यांच्या माध्यमातून जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. बच्चू कडू यांनी जरांगे यांना फोन करून एकनाथ शिंदे यांचा संदेश दिला. परभणीतील कार्यक्रम मराठा समाजाच्या विरोधात नसल्याचे शिंदे यांनी सांगितल्याचे कडू यांनी स्पष्ट केले. आता एकीकडे अंतरवाली सराटीत जरांगे यांच्या आंदोलनाची तीव्रता वाढत असताना, दुसरीकडे सरकारकडून चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याने पुढील काही दिवस या आंदोलनासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
