मी धाडस केलं नसतं तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागं गेला असता; अमरावतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधान

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचारासाठी उतरलेल्या एकनाथ शिंदेंनी शिक्षकांच्या मागण्याबाबत आश्वासनं दिलं.

News Photo   2026 10 18T170852.689

Eknath Shinde Amravati

Eknath Shinde Amravati : राज्यातील विधानपरिषद निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून 5 मतदारसंघांत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पुणे आणि अमरावती येथे शिक्षक (Shivsena) मतदारसंघासाठी मतदान होणार असल्याने प्रमुख नेते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. महायुतीने पुण्यातील जागा भाजपकडे ठेवली असून अमरावतीत शिवसेनेच्या किरण सरनाईक यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी अमरावतीचा दौरा केला. यावेळी त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

अमरावती शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रीती रेवने यांनी उमेदवारी मागे घेतल्याबद्दल शिंदे यांनी त्यांचे आभार मानले. तसेच महायुती म्हणून ही निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. शिवसेनेतील बंडाची आठवण करून देताना त्यांनी राणा दाम्पत्य तुरुंगात जाऊनही घाबरलं नाही, असं सांगितलं. आपणही धाडसाने निर्णय घेतला नसता, तर महाराष्ट्र 15 ते 20 वर्ष मागे गेला असता, असं ते म्हणाले. शिवसेनेत घेतलेला निर्णय ऐतिहासिक होता आणि त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार पडलं, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

सचिन सानप यांच्यासाठी शिवसेना मैदानात, सांगलीतील सभेला जोरदार प्रतिसाद!

शिक्षकांच्या प्रश्नांवर बोलताना शिंदे यांनी जुनी पेन्शन योजना आणि इतर मागण्यांबाबत सरकार कटिबद्ध असल्याचं सांगितलं. दिलेला शब्द पाळणं ही आपली भूमिका असल्याचं नमूद करत त्यांनी शिक्षकांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं. महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक शिक्षकांची कामं करतील आणि त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असंही ते म्हणाले. राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा उल्लेख करत शेतकऱ्यांना मदत देण्याची ग्वाही त्यांनी दिली. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना 5 हजार रुपये देण्यात येतील, तसेच पुढील काळात पात्र सवलतीही दिल्या जातील, असं शिंदे यांनी सांगितलं.

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी अमरावतीतील एम डब्ल्यू मंगल कार्यालयात दुपारी 4 वाजता सहविचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. अमरावती शिक्षक मतदारसंघातील निवडणूक सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. भाजपने बंडखोर उमेदवारांवर कारवाई केली असली, तरी शिवसेनेच्या शिंदे गटातील श्रीकांत देशपांडे अद्याप निवडणुकीच्या रिंगणात असल्याने महायुतीसमोर आव्हान कायम आहे. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात महायुतीकडून मतदारांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Exit mobile version