Fadnavis presents his stance on the Bhimashankar project : भीमाशंकर परिसरातील प्रस्तावित प्रकल्पावरून सध्या वृक्षतोडीचा मुद्दा चर्चेत आला आहे. या प्रकल्पामुळे जंगलाचं नुकसान होणार असल्याची टीका विरोधकांकडून केली जात असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. वृक्षतोडीवरून विरोधकांकडून फेक नॅरेटिव्ह पसरवलं जात असल्याचा आरोप करत, हा प्रकल्प स्वच्छ ऊर्जानिर्मितीसाठी महत्वाचा असल्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, हा प्रकल्प भीमाशंकरच्या जंगलापासून सुमारे 16 किलोमीटर, तर भीमाशंकर मंदिरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर आहे. या प्रकल्पातून पंप स्टोरेज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वच्छ ऊर्जेची निर्मिती केली जाणार आहे. हायड्रो पॉवर ही प्रदूषण न करणारी ऊर्जा असून औष्णिक उर्जेला हा एक चांगला पर्याय ठरू शकतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.
या प्रकल्पाच्या क्षेत्रात सुमारे 60 हजार झाडं लावली जाणार असून, प्रकल्पाच्या इतर परिसरात मिळून 90 हजार झाडांची लागवड केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कंपनीने वन विभागाला टिनपट जागा दिली असून, कंपनीच्या खर्चातून वन विभागाकडून 90 हजार झाडं लावली जाणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. या प्रकल्पातून निर्माण होणारी ऊर्जा ही सुमारे 28 कोटी झाडांच्या ऊर्जात्मक योगदानाइतकी असल्याचा दावा देखील त्यांनी केला.
क्लिपमागचं सत्य शोधून दाखवा, ऑडिओ बॉम्बवरून मनोज जरांगेंचं फडणवीस-शिंदेंना ओपन चॅलेंज
या प्रकल्पासाठी घेतलेल्या जमिनीचा वापर पाणी साठवण्यासाठी केला जाणार आहे. पंप स्टोरेजच्या माध्यमातून ऊर्जानिर्मिती करताना पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होईल, असा दावा देखील मुख्यमंत्र्यांनी केला. महाराष्ट्र हा पंप स्टोरेज प्रकल्पांचा हब बनत असल्याचं सांगत, भविष्यात राज्याच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी अशा प्रकल्पांची महत्वाची भूमिका असेल, असं त्यांनी नमूद केलं.
प्रकल्पाच्या मंजुरीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, वन विभाग आणि केंद्रीय वन विभागाकडून सुमारे 18 महिने सुनावणी आणि प्रक्रिया पार पाडल्यानंतर या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रकल्पाबाबतची वस्तुस्थिती समजून न घेता विरोधकांकडून आरोप केले जात असल्याची टीका त्यांनी केली. दरम्यान, या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होण्याची शक्यता असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मात्र, प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांची उपजीविका धोक्यात येणार असेल, तर त्यांचा देखील विचार केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. स्थानिक नागरिकांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मार्ग काढला जाईल, असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
