मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया (India) येथे ग्लोबल पीस ऑनर्स 2026 या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या दिव्याज फाउंडेशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद आणि पीडितांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वीरता, मानवता आणि जागतिक शांततेसाठी योगदान देणार्या व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह मनोरंजन, क्रीडा, उद्योग आणि सार्वजनिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.
या कार्यक्रमातील सर्वाधिक लक्षवेधी क्षण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आध्यात्मिक गुरू सद्गुरू जग्गी वासुदेव यांची घेतलेली मुलाखत. नेहमी विविध मंचांवर स्वतः मुलाखत देणारे मुख्यमंत्री यावेळी मुलाखतकाराच्या भूमिकेत दिसले. या संवादात आंतरिक शांतता, जागतिक शांतता आणि बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणार्या मानसिक आव्हानांवर सविस्तर चर्चा झाली.
दुष्काळाच्या झळा! फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, उद्याने, सिमेंट रस्त्यांच्या कामांना ब्रेक
आजच्या स्पर्धात्मक युगात करिअर, सामाजिक अपेक्षा आणि वाढत्या स्पर्धेचा दबाव तरुणांवर मोठ्या प्रमाणात आहे. अशा परिस्थितीत तरुणांनी आंतरिक शांतता कशी मिळवावी, असा प्रश्न फडणवीस यांनी सद्गुरूंना विचारला. व्यक्तीच्या मनात शांतता निर्माण झाल्यास त्याचा परिणाम समाजावर आणि पुढे संपूर्ण जगावर कसा होऊ शकतो, यावरही दोघांमध्ये विचारांची देवाणघेवाण झाली.
दरम्यान, महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या आपल्या संकल्पनेचाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी उल्लेख केला. नदीजोड प्रकल्प आणि जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जलसंधारण, पाण्याची उपलब्धता आणि शेतीसाठी पाण्याचे नियोजन करण्याबाबत त्यांनी माहिती दिली. ग्लोबल पीस ऑनर्सच्या माध्यमातून शांतता, मानवता आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
