दूध भेसळीचा मुद्दा जयंत पाटलांनी सभागृहात मांडला, थेट मुख्यमंत्र्यांकडे केली चौकशीची मागणी

राज्यात दूध भेसळ आणि संकलनातील कथित गैरप्रकारांचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

Untitled Design 30

Untitled Design 30

Jayant Patil makes serious allegation : राज्यात दूध भेसळ आणि संकलनातील कथित गैरप्रकारांचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. पुणे जिल्ह्यातील मंचरमध्ये एफडीएच्या कारवाईमुळे दूध भेसळीचा मुद्दा चर्चेत आला होता. या प्रकरणाचे धागेदोरे बीडपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली असतानाच, विधासभेतील चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी नाव न घेता बीडमधील एका आमदाराच्या पत्नीवर गंभीर आरोप करत सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून, नेमका त्यांचा रोख कोणत्या आमदाराकडे होता, याबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

जयंत पाटील यांनी आरोप केला की, बीड जिल्ह्यात एका आमदाराची पत्नी डेअरी चालकांवर आणि दूध संकलन करणाऱ्या संस्थानांवर दबाव टाकत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. मोठ्या दूध प्रक्रिया कंपन्यांना देखील निकृष्ट दर्जाचे दूध स्वीकारण्यासाठी दमदाटी केली जात असल्याचे आरोप होत आहेत. या संपूर्ण प्रकारची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती राज्य सरकारने जनतेसमोर आणावी, अशी त्यांनी मागणी केली.

शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? केंद्राकडील डेटा अडकल्याने महायुती सरकारची अंमलबजावणी रखडली

यावेळी त्यांनी माध्यमांवरील दबावाचा देखील मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणाबाबत लेट्स अप मीडियाने बातमी प्रसिद्ध केली, तर संबंधित वृत्तसंस्थेला देखील धमक्या दिल्या जातात. इतकच नाही, तर संबंधित आमदाराची पत्नी थेट संपादकांना फोन करून दबाव आणते आणि धमक्या देते, असे ऐकायला मिळत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील लक्ष्य करत, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. संबंधित व्यक्ती कोण आहे, ती कोणत्या आमदाराची पत्नी आहे, हे सरकारने स्पष्ट करावे. पुढील अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री सभागृहात याबाबत माहिती देतील, अशी अपेक्षा आहे, अशी खोचक टिप्पणी केली. जयंत पाटील यांनी कोणत्याही आमदाराचे किंवा त्यांच्या पत्नीचे नाव घेतले नाही. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा नेमका रोख कोणाकडे होता, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. बीड जिल्ह्यातील राजकारण, दूध व्यवसाय आणि स्थानिक सत्ताकारणाचा पार्श्वभूमीवर या आरोपांकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

Exit mobile version