पक्ष चिन्ह ठाकरेंकडं की शिंदेंकडं?, सिब्बल सुप्रीम कोर्टात आज पुन्हा बाजू मांडणार, शिंदे गटासमोर मोठं आव्हान

मागील सुनावणीत सिब्बल यांनी अपात्रता, पक्षाची संघटनात्मक रचना आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयावर जोरदार आक्षेप घेतला होता.

Thackeary

पक्ष चिन्ह ठाकरेंकडं की शिंदेंकडं?, सिब्बल सुप्रीम कोर्टात आज पुन्हा बाजू मांडणार, शिंदे गटासमोर मोठं आव्हान

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील (Shivsena) अधिकाराच्या वादावर आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. दुपारी २ वाजता सुनावणीला सुरुवात होणार असून, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल युक्तिवाद पुढं नेणार आहेत. मागील सुनावणीत सिब्बल यांनी अपात्रता, पक्षाची संघटनात्मक रचना आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयावर जोरदार आक्षेप घेतला होता. त्यामुळं आजच्या सुनावणीत त्यांच्या युक्तिवादाकडं विशेष लक्ष लागलं आहे.

मागील सुनावणीत सिब्बल यांनी शिवसेनेच्या पक्षघटनेतील तरतुदी, संघटनात्मक अधिकार आणि पक्षातील निर्णय घेण्याची प्रक्रिया यांचा दाखला देत पक्षावर उद्धव ठाकरे यांचाच दावा असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. पक्षाच्या घटनेत नेमका बदल कधी झाला, संघटनेतील अधिकार कोणाकडे होते आणि पक्षाची संघटना कोणाच्या पाठीशी होती, यावर त्यांनी सविस्तर बाजू मांडली. विधिमंडळातील आमदारांची संख्या हीच राजकीय पक्षावरील मालकी निश्चित करण्याचा आधार ठरू शकत नाही, असा मुद्दाही त्यांनी मांडला.

शिंदे यांच्या बंडानंतर विधिमंडळ पक्षात फूट पडली. मात्र, ती राजकीय पक्षातील फूट नव्हती, असा ठाकरे गटाचा युक्तिवाद आहे. निवडणूक आयोगाने विधिमंडळातील संख्याबळाच्या आधारे निर्णय घेताना पक्षाची संघटनात्मक बाजू आणि पक्षघटनेतील तरतुदींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सिब्बल यांनी केला. यावेळी जनता दल आणि समाजवादी पार्टीसह अन्य राजकीय पक्षांच्या प्रकरणांचे संदर्भ देत पक्षातील फूट, पक्षावरील नियंत्रण आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील कायदेशीर निकष न्यायालयासमोर मांडण्यात आले.

निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरही सिब्बल यांनी मागील सुनावणीत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आयोगाने आपल्या अधिकारकक्षेच्या पलीकडे जाऊन शिंदे गटाच्या बाजूने काही निष्कर्ष काढल्याचा दावा त्यांनी केला. आयोगाकडं सादर केलेल्या कागदपत्रांच्या पोहोच पावत्यांसह काही महत्त्वाची कागदपत्रं न्यायालयाने विचारात घ्यावीत, अशी विनंतीही त्यांनी केली होती. त्यामुळं आजच्या सुनावणीत या कागदपत्रांसह आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवर पुन्हा जोरदार युक्तिवाद होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ठाकरे गटाच्या युक्तिवादाला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ज्येष्ठ विधिज्ञ नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंह बाजू मांडणार आहेत. ठाकरे गटाने मांडलेला संघटनात्मक दावा आणि पक्षघटनेचा आधार खोडून काढण्याचं मोठं आव्हान शिंदे गटासमोर असेल. त्यामुळं आजची सुनावणी केवळ पक्ष आणि चिन्हाच्या वादासाठीच नव्हे, तर शिवसेनेवरील अंतिम कायदेशीर दाव्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जात आहे.

Exit mobile version