Karale Master to contest Graduate constituency election : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला असून इच्छुक उमेदवारांनीही तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर कराळे मास्तर म्हणून लोकप्रिय असलेले नितेश कराळे यांनीही निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. पक्षाकडे तिकीट मागणार असून तिकीट न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले आहेत.
मागील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आपण तिसऱ्या क्रमांकावर होतो आणि जवळपास साडेआठ हजार मतदारांनी आपल्याला मतदान केले होते, असे कराळे यांनी सांगितले. त्यावेळी सोशल मीडियावर लोकप्रिय होऊन काहीच दिवस झाले होते आणि कोणतेही मोठे संघटन पाठीशी नसतानाही विदर्भ आणि नागपूर परिसरातून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे ते म्हणाले. त्यामुळे यावेळी आपण प्रबळ दावेदार असल्याचा दावा कराळे यांनी केला आहे.
पदवीधर आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न विधान परिषदेत मांडण्यासाठी निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. पदवीधरांसाठी विधान परिषदेत स्वतंत्र जागा असतानाही संबंधित आमदारांकडून विद्यार्थ्यांचे प्रश्न अपेक्षित पद्धतीने मांडले जात नसल्याची टीकाही त्यांनी केली. 28 सप्टेंबर रोजी पक्षाची बैठक होणार असून या बैठकीत आपण उमेदवारीची मागणी करणार असल्याचे कराळे यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत अनेक सभा आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून पक्षासाठी काम केले असून पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आपलाही वाटा राहिल्याचे त्यांनी सांगितले.
दुष्काळवर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा; 17 मागण्यांचे शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
त्यामुळे पक्षाने आपल्या कामाची दखल घेऊन उमेदवारी द्यावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. पक्षाने तिकीट दिले नाही, तर अपक्ष जिंदाबाद आहेच, असे म्हणत कराळे यांनी थेट अपक्ष लढण्याचे संकेत दिले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपण माघार घेतल्याने काँग्रेसला फायदा झाला होता. त्यामुळे यावेळी आपल्याला न्याय मिळावा आणि पक्षाने उमेदवारीबाबत सकारात्मक विचार करावा, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
विद्यार्थ्यांकडूनही निवडणूक लढवण्यासाठी आग्रह होत असल्याचा दावा कराळे यांनी केला. विद्यार्थ्यांच्या विविध आंदोलनांमध्ये आपण भूमिका घेतली, त्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलो आणि प्रसंगी स्वतःवर गुन्हेही दाखल करून घेतले. त्यामुळे यावेळी निवडणूक लढवली पाहिजे, अशी विद्यार्थ्यांची भावना असल्याचे त्यांनी सांगितले.
ही निवडणूक शक्य तितक्या कमी खर्चात आणि ‘झिरो बजेट’ पद्धतीने लढवण्याचा मानस असल्याचेही कराळे यांनी स्पष्ट केले. आपल्यासाठी विद्यार्थीही खर्च करण्यास तयार असल्याचे सांगत जास्तीत जास्त 25 लाख रुपयांच्या खर्चात निवडणूक लढवण्याचा प्रयत्न असेल, असे ते म्हणाले. त्यामुळे पक्षाकडून उमेदवारी मिळते की कराळे मास्तर अपक्ष मैदानात उतरतात, याकडे आता लक्ष लागले आहे.
