London Stock Exchange announcement : जगभरातील आर्थिक व्यवहारांचे स्वरूप झपाट्याने बदलत असून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल तंत्रज्ञान आणि स्वयंचलित व्यवहारांच्या युगात आता शेअर बाजार देखील नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. याच पार्श्वभूमीवर ब्रिटनमधील स्टॉक एक्स्चेंजने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गुंतवणूकदारांना जवळपास 24 तास व्यवहार करण्याची सुविधा उपलब्द्ध करून देण्यासाठी एक्स्चेंजने एलएसई 24 या नव्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची घोषणा केली आहे. या नव्या प्लॅटफॉर्ममुळे जगातील विविध वेळ क्षेत्रांमध्ये असलेल्या गुंतवणूकदारांना बाजारातील घडामोडींवर तात्काळ प्रतिक्रिया देणे शक्य होणार आहे. तसेच व्यवहारातील तरलता वाढवणे आणि जोखीम व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे एक्सचेंजकडून सांगण्यात आले आहे.
कसे असेल एलएसई 24 चे कामकाज?
एलएसई 24 हा प्लॅटफॉर्म सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसांमध्ये जवळपास अखंडपणे सुरू राहणार आहे. दररोज सायंकाळी ५ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 7.50 वाजेपर्यंत व्यवहार करता येणार आहेत. मात्र,दैनंदिन बंद प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संध्याकाळी 6.30 ते 7 या वेळेत 30 मिनिटांचा अल्पविराम ठेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, लंडन स्टॉक एक्सचेंजचे मुख्य बाजारपेठेतील नियमित व्यवहार पूर्वीप्रमाणेच सकाळी 8 ते संध्याकाळी 4.30 या वेळेत सुरू राहतील. ‘एलएसई 24’ हा स्वतंत्र आणि अतिरिक्त व्यवहार मंच म्हणून कार्यरत राहणार आहे.
2027 मध्ये अधिकृत सुरुवात
मिळालेल्या माहितीनुसार, 2026 च्या अखेरीस या नव्या प्लॅटफॉर्मची चाचणी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. नियामक संस्थांची मंजुरी मिळाल्यानंतर 2027 च्या पहिल्या सहामाहीत ‘एक्सचेंज ट्रेडेड प्रॉडक्ट्स’ (ईटीपी) सह ‘एलएसई 24’ अधिकृतपणे सुरू होईल. लंडन हे आधीपासूनच ईटीपी व्यवहारांचे एक महत्त्वाचे जागतिक केंद्र मानले जाते.
फूड डिलिव्हरी अॅप्स बनले आंदोलनातील नवे माध्यम; देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले जेवण
एआय आणि स्वयंचलित व्यवहारांवर भर
ईटीपीनंतर पुढील टप्प्यात या प्लॅटफॉर्मवर समभागांच्या (इक्विटी) व्यवहारांनाही परवानगी दिली जाणार आहे. ‘एलएसई 24’ हे पुढील पिढीतील एआय-आधारित, एजंट-आधारित आणि पूर्णपणे स्वयंचलित व्यवहार प्रणालींसाठी सुरक्षित आणि सक्षम नेटवर्क उपलब्ध करून देणार आहे. यामुळे ऑर्डर व्यवस्थापन, बाजारातील माहितीचे विश्लेषण आणि व्यवहारांची अंमलबजावणी अधिक वेगवान, अचूक आणि सुलभ होणार आहे. याशिवाय हा प्लॅटफॉर्म एलएसईजीच्या डिजिटल सिक्युरिटीज डिपॉझिटरीशी जोडला जाणार असून डिजिटल स्वरूपातील मालमत्तांचे व्यवस्थापन आणि सेटलमेंट प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.
गुंतवणूकदारांना अधिक लवचिकता
लंडन स्टॉक एक्सचेंजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ज्युलिया हॉगेट यांनी सांगितले की, ‘एलएसई 24’ मुळे पारंपरिक व्यवहार वेळेच्या मर्यादा कमी होतील आणि गुंतवणूकदारांना अधिक लवचिकता तसेच अधिक तरलता मिळेल. डिजिटल युगातील आर्थिक गरजा लक्षात घेऊन उचललेले हे पाऊल लंडनला जागतिक वित्तीय केंद्र म्हणून आणखी बळकटी देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकूणच, शेअर बाजारातील व्यवहारांची संकल्पना बदलणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात असून भविष्यात जगातील इतर प्रमुख शेअर बाजारही अशाच प्रकारच्या 24 तास व्यवहार व्यवस्थेकडे वाटचाल करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
