Manipur Shutdown : मणिपूरमध्ये चार तांगखुल नागा नागरिकांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी पुकारण्यात आलेल्या २४ तासांच्या बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाले. १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या या हत्याकांडाच्या निषेधार्थ नेटिव्ह पीपल्स कमिटी, मणिपूर (NPCM) या संघटनेने बंदची हाक दिली होती. इम्फाळमध्ये आंदोलनकर्त्यांनी रस्ते अडवून धरल्याने वाहतूक ठप्प झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. बंदचा परिणाम खोऱ्यातील पाच जिल्ह्यांसह उखरुलमधील नागा बहुल भागातही जाणवला.
या बंदच्या पार्श्वभूमीवर कोंसाखुल गावातील नागा शहीद स्मारक उद्यानात सहा लियांगमाई नागा नागरिकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या सहा जणांचे शिरच्छेद केलेले मृतदेह १० जून रोजी आढळले होते. त्यापूर्वी १३ मे रोजी कांगपोकपी जिल्ह्यातील लेइलोन वैफेई गावातून त्यांचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप आहे. न्याय मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतल्याने मृतदेह पाच महिन्यांहून अधिक काळ इम्फाळमधील जेएनआयएमएस रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले होते.
या सहा नागरिकांवरील अंत्यसंस्काराचा निर्णय २६ सप्टेंबर रोजी गुवाहाटी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. या बैठकीला नागा संघटनांचे प्रतिनिधी, राज्य सरकारचे अधिकारी आणि केंद्रीय गृह मंत्रालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान, बंदमुळे बाजारपेठा, शाळा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद राहिली. काही खासगी वाहने मात्र रस्त्यांवर दिसून आली. अनेक भागांत नागरिकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले.
Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील चिंगमैरोंग परिसरात आंदोलकांनी टायर जाळून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. हत्याकांडातील दोषींवर कारवाई करून न्याय देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सुरक्षा दलांनी रस्त्यावरील अडथळे हटवण्याचा प्रयत्न केल्यानंतर परिस्थिती चिघळली. काही आंदोलकांनी दगडफेक केल्याचा आरोप असून, त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला.
दुसरीकडे, तांगखुल नागा लाँग (TNL) या संघटनेनेही तांगखुल बहुल भागात स्वतंत्रपणे २४ तासांच्या बंदचे आवाहन केले होते. या संघटनेने कुकी दहशतवाद्यांवर हल्ल्यांचा आरोप करत सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर नाराजी व्यक्त केली. वारंवार लक्ष्य करून हत्या होत असतानाही राज्य आणि केंद्र सरकारकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप संघटनेने केला. वीज, पाणीपुरवठा, अग्निशमन, आपत्कालीन सेवा आणि वैद्यकीय सेवा यांना बंदमधून वगळण्यात आले होते.
दरम्यान, कुकी समुदायाशी संबंधित कमिटी ऑन ट्रायबल युनिटी (CoTU) या संघटनेनेही राज्य सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. ठोस तोडगा काढण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत संघटनेने रविवारी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. त्यानुसार कांगपोकपी जिल्ह्यात सेनापती पोलीस अधीक्षकांच्या नियंत्रणाखालील सर्व सुरक्षा दलांना असहकार्य करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. तसेच सीमावर्ती संवेदनशील भागांत गावातील स्वयंसेवक तातडीने तैनात करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
