Manoj Jarange’s health has deteriorated : मुंबईत आंदोलनासाठी निघालेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आणखी खालावली आहे. सध्या ते बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे मुक्कामी असून, प्रकृती अस्वस्थ असल्याने ते अद्याप मुक्कामाच्या ठिकाणी विश्रांती घेत आहेत. पहाटे सुमारे 3 वाजता डॉक्टर त्यांची तपासणी करण्यासाठी आले होते. मात्र, जरांगे पाटील यांनी वैद्यकीय तपासणी आणि उपचार घेण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे.
जरांगे पाटील यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांना वैद्यकीय तपासणी आणि उपचारांची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत असले, तरी त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. प्रकृती खालावल्यामुळे त्यांच्या पुढील प्रवासाबाबत आणि मुंबईकडे रवाना होण्याच्या वेळेबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांमध्येही त्यांच्या प्रकृतीसह पुढील आंदोलनाच्या नियोजनाबाबत चर्चा सुरू आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार का, की पुढील प्रवासाबाबत वेगळा निर्णय घेतला जाणार, याकडे आता समर्थकांचे लक्ष लागले आहे.
माझ्याच इथे या, इथेच चर्चा करा हे चालणार नाही, मनोज जरांगेंच्या आंदोलनावर प्रवीण दरेकर आक्रमक
दरम्यान, एकीकडे जरांगे पाटील यांच्या प्रकृतीचा प्रश्न गंभीर बनत असताना दुसरीकडे मुंबईतील आंदोलनाच्या परवानगीचाही पेच कायम आहे. मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी अद्याप मिळालेली नाही. मुंबई पोलिसांनी यापूर्वी त्यांचा परवानगी अर्ज नाकारल्यानंतर पुन्हा अर्ज करण्यात आला होता. मात्र, दुसऱ्यांदा करण्यात आलेल्या अर्जालाही परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती आहे.
आंदोलनाला परवानगी मिळालेली नसतानाही मुंबईकडे जाण्याच्या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम असल्याचे सांगितले जात आहे. आजही आंदोलनासाठी परवानगी न मिळाल्यास त्यांच्या वकिलांकडून हायकोर्टात दाद मागितली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे सध्या जरांगे पाटील यांच्यासमोर दुहेरी पेच निर्माण झाला आहे. एका बाजूला त्यांची खालावलेली प्रकृती आणि दुसऱ्या बाजूला मुंबईतील आंदोलनाच्या परवानगीचा प्रश्न कायम आहे. या पार्श्वभूमीवर पुढील काही तास महत्त्वाचे ठरणार आहेत. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा होते का, ते पाटोद्यातून मुंबईच्या दिशेने कधी रवाना होतात आणि आंदोलनाच्या परवानगीबाबत काय निर्णय होतो, याकडे त्यांच्या समर्थकांसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
