Minister Vikhe Patil furious : MPSC औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या चेहऱ्यावर काळं फासल्याच्या घटनेनंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे; मात्र अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर काळं फासणे किंवा त्यांना अशा प्रकारे त्रास देणे योग्य नाही, अशा शब्दांत विखे पाटील यांनी संभाजी ब्रिगेडला सुनावले. MPSCच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः चौकशीचे आदेश दिले आहेत.
तसेच विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून संबंधित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा असून त्याचे स्वागत केले पाहिजे, असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले. परीक्षा पुढे ढकलण्यामागे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळणे हाच उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले. संभाजी ब्रिगेडने मात्र सरकार आणि MPSC प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांनी ३ ऑगस्ट रोजी झालेल्या आंदोलनावेळी कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या चेहऱ्यावर काळं फासण्यात आल्याने या आंदोलनाला आक्रमक वळण मिळाले.
Bhandara Accident – नागपूर-रायपूर महामार्गावर भीषण अपघात; तीन चिमुकल्यांसह 9 जणांचा मृत्यू
सरकारला ज्या भाषेत समजते, त्या भाषेत उत्तर दिले
अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे. MPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने पाहावे, पेपरफुटीप्रकरणी कठोर कारवाई करावी आणि MPSCचे अध्यक्ष व सचिव यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. अध्यक्ष व सचिवांनी तत्काळ राजीनामा न दिल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही संभाजी ब्रिगेडने दिला आहे.संभाजी ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत आणि मुंबई अध्यक्ष सुहास राणे यांनी केलेल्या या कृतीच्या समर्थनार्थ जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी संघटना त्यांच्या पाठीशी ठाम असल्याचे सांगितले. त्यामुळे एका बाजूला विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सरकारने चौकशी आणि परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असताना दुसऱ्या बाजूला आंदोलनाच्या पद्धतीवरून सरकार विरुद्ध संभाजी ब्रिगेड असा नवा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.
विद्यार्थ्यांचा प्रश्न गंभीर; पण आंदोलनाच्या पद्धतीवर विखेंचा आक्षेप
MPSC पेपरफुटीच्या आरोपांमुळे आधीच विद्यार्थ्यांमध्ये नाराजी असताना सचिवांच्या चेहऱ्यावर काळं फासल्याच्या घटनेने या प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे. आता सरकारने चौकशीचा निर्णय घेतल्याचे सांगत विखे पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना संयमाचा सल्ला दिला आहे; तर संभाजी ब्रिगेडने मात्र कारवाई न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिल्याने MPSCचा मुद्दा चांगलाच तापला आहे.
