VS Hair Growth Oil : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केस उगवणे, केसांची वाढ होणे आणि टक्कल दूर होण्याचे दावे करणाऱ्या आयुर्वेदिक हेअर ऑईलचा सुमारे 50 लाख 34 हजार 960 रुपयांचा (FDA) साठा अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक विभागाने जप्त केला आहे. इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर जाहिराती करून ग्राहकांना आकर्षित करत या उत्पादनाची विक्री केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे. उत्पादनाच्या लेबलवर उत्पादकाचे नाव, पूर्ण पत्ता आणि उत्पादन परवान्याचा क्रमांक नसल्याचेही आढळून आले.
नाशिकमधील कॉलेज रोड, सहजीवन कॉलनी, विसे मळा येथील रूपल अपार्टमेंटमधील शॉप क्रमांक 1 येथे एम. के. एस. न्यू फॅशन झोन या ब्युटी सलून आणि इमिटेशन ज्वेलरी व्यवसायाच्या ठिकाणाहून या उत्पादनाची सोशल मीडियावर जाहिरात करून विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता ‘मार्केटेड बाय एम. के. एस. न्यू फॅशन झोन, नाशिक’ असा उल्लेख असलेले हेअर ऑईल आढळले. मात्र, उत्पादकाचे नाव, पत्ता आणि आवश्यक उत्पादन परवान्याचा तपशील उपलब्ध नव्हता.
आरोग्य संवाद यात्रेत हलगर्जीपणा भोवला! ११ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई
5 नोव्हेंबर रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पंचांसमक्ष तपासणी करून ‘VS Hair Growth Oil’ या उत्पादनाच्या 100 मिलीच्या एकूण 5,040 बाटल्या जप्त केल्या. प्रत्येक बाटलीची कमाल किरकोळ किंमत 999 रुपये असून, जप्त साठ्याची एकूण किंमत 50 लाख 34 हजार 960 रुपये आहे. बॅच क्रमांक VS 1984 आणि उत्पादन दिनांक सप्टेंबर 2026 असा तपशील असलेल्या या उत्पादनासह साठ्यातील इतर उत्पादनांचे नमुनेही तपासणी व विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. आवश्यक कायदेशीर परवानग्या नसल्याने औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, टक्कल घालवणे, केस उगवणे आणि वजन कमी करणे यांसारखे भ्रामक दावे करणाऱ्या सोशल मीडिया जाहिरातींना नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कोणतेही औषध किंवा सौंदर्यप्रसाधन खरेदी करताना त्याच्या लेबलवर उत्पादकाचे नाव, पूर्ण पत्ता आणि उत्पादन परवाना क्रमांक असल्याची खात्री करावी. तसेच, संशयास्पद जाहिराती किंवा उत्पादनांची माहिती जवळच्या अन्न व औषध प्रशासन कार्यालयाला अथवा प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800-222-365 वर द्यावी, असे आवाहन सह आयुक्त (औषधे), मुख्यालय, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.
