New weekly insulin : मधुमेहाच्या रुग्णांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. भारतात आता असे इन्सुलिन उपलब्ध झाले आहे, जे दररोज घेण्याऐवजी आठवड्यातून फक्त एकदाच घ्यावे लागणार आहे. औषधनिर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी नोवो नॉर्डिस्कने अवीक्ली या नावाने हे साप्ताहिक इन्सुलिन बाजारात आणले आहे. तज्ज्ञांच्या मते, अनेक मधुमेही रुग्णांना दररोज इन्सुलिनचे इंजेक्शन घेण्याची भीती वाटते किंवा व्यस्त जीवनशैलीमुळे वेळेवर इन्सुलिन घेणे शक्य होत नाही. अशा रुग्णांसाठी आठवड्यातून एकदा घेतले जाणारे हे इन्सुलिन उपचार अधिक सोपे आणि सोयीस्कर ठरू शकते.
मधुमेहतज्ज्ञ डॉ. एस. के. वांगणू यांच्या मते, ज्या रुग्णांना मधुमेह होऊन 8 ते 10 वर्षे झाली आहेत आणि ज्यांची रक्तातील साखर केवळ गोळ्यांनी नियंत्रणात राहत नाही, त्यांनी योग्य वेळी इन्सुलिन उपचार सुरू करणे गरजेचे आहे. त्यामुळे डोळे, मूत्रपिंड, मज्जातंतू आणि इतर अवयवांवरील गुंतागुंत कमी होण्यास मदत होऊ शकते.
भारतीय पर्यटकांची व्हिएतनाम सहल ठरली दुर्दैवी; 32 पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीडबोट समुद्रात उलटली, 15 जणांचा मृत्यू
डॉ. रवी गोडसे यांचे मत काय?
मधुमेहतज्ज्ञ डॉ. रवी गोडसे यांनी या नव्या इन्सुलिनबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या मते, हे साप्ताहिक इन्सुलिन मुख्यतः टाइप-2 मधुमेह असलेल्या आणि दीर्घकाळापासून इन्सुलिनची गरज असलेल्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरू शकते. विशेषतः दररोज इंजेक्शन घेण्यास अडचण येणारे, वारंवार प्रवास करणारे किंवा उपचारांमध्ये सातत्य राखणे कठीण जाणारे रुग्ण याचा लाभ घेऊ शकतात. मात्र हे इन्सुलिन प्रत्येकासाठी योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. टाइप-1 मधुमेहाचे रुग्ण, गर्भवती महिला, तसेच काही विशिष्ट वैद्यकीय स्थिती असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे इन्सुलिन घेऊ नये. कोणत्याही रुग्णाने स्वतःहून उपचारात बदल करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
अगले हफ़्ते एक और कूली इन्सुलिन लेगा! pic.twitter.com/6Prp48Q8GH
— DrRavi (@DrGodseRavi1) July 10, 2026
किंमत किती?
कंपनीच्या माहितीनुसार, या इन्सुलिनचा सरासरी खर्च सुमारे 261 रुपये प्रति आठवडा, म्हणजेच दिवसाला जवळपास 50 रुपये इतका येतो. हे औषध दोन प्री-फिल्ड पेनमध्ये उपलब्ध आहे. 700 युनिट क्षमतेच्या पेनची किंमत 2,611 रुपये असून 2,100 युनिट क्षमतेच्या पेनची किंमत 7,883 रुपये आहे. सामान्यतः एका रुग्णाला आठवड्याला सुमारे 70 युनिट इन्सुलिनची गरज भासू शकते, मात्र अंतिम मात्रा डॉक्टरच निश्चित करतात.
दुष्परिणामांची शक्यता
या साप्ताहिक इन्सुलिनमुळे काही दुष्परिणामही होऊ शकतात. त्यापैकी सर्वात सामान्य दुष्परिणाम म्हणजे रक्तातील साखर अत्यंत कमी होणे, ज्याला ‘हायपोग्लायसेमिया’ म्हणतात. तज्ज्ञांच्या मते हा धोका दररोज घेतल्या जाणाऱ्या इन्सुलिनइतकाच आहे. त्यामुळे हे इन्सुलिन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि नियमित तपासण्यांसहच वापरणे आवश्यक आहे. तज्ज्ञांचे मत आहे की, आठवड्यातून एकदाच घेण्याच्या या नव्या पद्धतीमुळे अधिक रुग्ण वेळेवर इन्सुलिन उपचार स्वीकारतील. परिणामी रक्तातील साखरेवर अधिक चांगले नियंत्रण मिळवणे आणि एचबीए१सीची पातळी सुधारण्यास मदत होऊ शकते.
