Noel Tata vs. Chandrasekaran dispute reaches court : टाटा समूहातील अंतर्गत वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या तिसऱ्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील पुनर्नियुक्तीला टाटा ट्रस्टच्या दोन ट्रस्टनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिले आहे. मात्र, या प्रकरणात तातडीचा दिलासा देण्यास न्यायालयाने शुक्रवारी (27 नोव्हेंबर) नकार दिला. त्यामुळे 30 नोव्हेंबर रोजी होणारी टाटा सन्सच्या संचालक मंडळाची बैठक नियोजित वेळापत्रकानुसार पार पडणार आहे. मात्र, या बैठकीत घेतले जाणारे निर्णय न्यायालयाच्या अंतिम आदेशांच्या अधीन असतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. बैठकीला स्थगिती द्यावी किंवा चंद्रशेखरन यांना बैठकीत निर्णायक मताधिकाराचा वापर करण्यापासून रोखावे, अशी मागणी ट्रस्टच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, चंद्रशेखरन सध्या दुसऱ्या कार्यकाळातही अध्यक्षपदावर कार्यरत असताना बैठकीला स्थगिती देण्याची किंवा त्यांचा मतदानाचा अधिकार रोखण्याची गरज काय, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.
न्यायालयाने तातडीचा कोणताही दिलासा देण्यास नकार देत 30नोव्हेंबरची बैठक नियोजित वेळेनुसार होऊ द्यावी, असे सांगितले. तसेच बैठकीत होणारे सर्व निर्णय न्यायालयाच्या अंतिम आदेशांच्या अधीन राहतील, असेही स्पष्ट केले. टाटा सन्स आणि या प्रकरणातील इतर प्रतिवादी संचालकांना उत्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले असून, पुढील सुनावणी 18 जानेवारी 2027 रोजी होणार आहे.
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्यांना कळतं, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचा खेळ राज ठाकरेंनी आधीच ओळखला होता?
सर दोराबजी टाटा ट्रस्ट6 आणि आरडी टाटा ट्रस्ट यांनी 26 नोव्हेंबर रोजी टाटा सन्स आणि त्यांच्या सहा संचालकांविरोधात याचिका दाखल केली होती. चंद्रशेखरन यांची 17 सप्टेंबर रोजी तिसऱ्यांदा पाच वर्षांसाठी कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा दावा या ट्रस्टनी केला आहे. सर दोराबजी टाटा ट्रस्टने 50 कोटी रुपये, तर आरडी टाटा ट्रस्टने 15 कोटी रुपये नुकसानभरपाईची मागणी केली आहे. या रकमेवर वार्षिक 18 टक्के व्याज देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
टाटा सन्सच्या घटनेतील कलम 121 नुसार, अशा नियुक्तीसाठी ट्रस्टच्या विश्वस्तांचे बहुमताने सकारात्मक मतदान आवश्यक असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. 17 सप्टेंबरच्या बैठकीत टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी नियुक्तीच्या बाजूने सकारात्मक मतदान केले नव्हते. त्यामुळे आवश्यक बहुमत मिळाले नसताना इतर संचालकांच्या मतांच्या आधारे निर्णायक मताचा वापर करून नियुक्तीचा निर्णय घेणे चुकीचे असल्याचा युक्तिवाद ट्रस्टच्या वतीने करण्यात आला.
ट्रस्टच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडली. दोन मतांमध्ये बहुमत ठरवता येत नाही, त्यासाठी एकापेक्षा अधिक सकारात्मक मते आवश्यक आहेत, असे त्यांनी न्यायालयात सांगितले. तसेच चंद्रशेखरन यांचा तिसरा कार्यकाळ 27 फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणार असल्याने 30 नोव्हेंबरच्या बैठकीत त्यांच्या पुनर्नियुक्तीला मंजुरी देण्याची गरज नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
दुसरीकडे, आरडी टाटा ट्रस्टच्या वतीने ज्येष्ठ वकील अस्पी चिनॉय यांनी युक्तिवाद केला. आवश्यक सकारात्मक बहुमत नसताना निर्णायक मताचा वापर करून पुनर्नियुक्तीचा ठराव मंजूर करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. या निर्णयामुळे टाटा सन्सच्या घटनेतील तरतुदींची रचना आणि परंपरा मोडीत निघाल्याचा दावाही त्यांनी केला.
डिलिमिटेशनमुळं लोकशाहीला मोठा धोका, राज्यसभेचं महत्त्व संपणार, घटना तज्ज्ञ उल्हास बापट काय म्हणाले?
मात्र, टाटा सन्सच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी ट्रस्टचे आरोप फेटाळून लावले. दोन ट्रस्ट प्रतिनिधी असताना बहुमताचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे निर्णायक मताचा वापर करणे आवश्यक होते, असे त्यांनी सांगितले. नोएल टाटा यांनी आपल्या अटींनुसारच निर्णय व्हावा, अशी भूमिका घेत कंपनीच्या कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा आरोपही साळवे यांनी केला. पुनर्नियुक्तीचा निर्णय सप्टेंबरमध्ये झाला असताना नोव्हेंबरमध्येच याचिका का दाखल करण्यात आली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
याशिवाय, टाटा सन्सला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 12 डिसेंबरपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्याची मुदत देण्यात आली आहे. कंपनीच्या नियामक अटींनुसार शेअर बाजारात नोंदणी करण्याबाबत निर्णय कळवणे आवश्यक असल्याने 30 नोव्हेंबरची बैठक महत्त्वाची असल्याचे साळवे यांनी न्यायालयाला सांगितले. मात्र, आरबीआयच्या निर्देशांचा आधार घेऊन बैठकीसाठी विनाकारण घाई केली जात असल्याचा आरोप सिंघवी यांनी केला.
दरम्यान, टाटा ट्रस्टकडे टाटा सन्समधील सुमारे 66 टक्के हिस्सेदारी आहे. त्यामुळे या दोन्ही संस्थांमधील वादाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीचा निर्णय रद्द ठरवावा आणि टाटा सन्सला या ठरावाची अंमलबजावणी करण्यापासून रोखावे, अशी मागणी ट्रस्टनी केली आहे. आता 30 नोव्हेंबरची संचालक मंडळाची बैठक पार पडणार असली, तरी त्यातील निर्णयांचे भवितव्य मुंबई हायकोर्टाच्या अंतिम आदेशांवर अवलंबून असणार आहे. त्यामुळे टाटा समूहातील हा अंतर्गत संघर्ष आगामी काळात आणखी कोणते वळण घेतो, याकडे उद्योगविश्वाचे लक्ष लागले आहे.
