राजन पाटील ठरले चार आमदारांचे मामा; मराठवाडा पदवीधर निवडणुकीत प्रतापसिंह पाटीलांच्या विजयानंतर राजकीय नातेसंबंधांची चर्चा

राज्याच्या राजकारणातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांशी असलेले नातेसंबंध, यामुळे पाटील कुटुंबाची मराठवाड्यात वेगळी ओळख आहे.

WhatsApp Image 2026 10 28 At 6.39.20 PM

WhatsApp Image 2026 10 28 At 6.39.20 PM

Political connections of MLA Pratapsinh Patil : मराठवाड्याच्या राजकारणात आज एका विजयाची जोरदार चर्चा आहे. छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी बाजी मारली आहे. या निवडणुकीत त्यांनी माजी आमदार सतीश चव्हाण यांना मागे टाकत राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेतलं आहे. मात्र, डॉ. प्रतापसिंह पाटील यांची ओळख केवळ एका विजयी उमेदवारापुरती मर्यादित नाही. वैद्यकीय शिक्षण, शैक्षणिक संस्थांचं जाळं, राजकीय वारसा आणि राज्याच्या राजकारणातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांशी असलेले नातेसंबंध, यामुळे पाटील कुटुंबाची मराठवाड्यात वेगळी ओळख आहे.

डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांचे परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील हे सख्खे भाऊ, तर माजी आमदार अमरसिंह पंडित आणि गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्याशीही त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत, असं राजन पाटील यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना सांगितलं होतं. त्यामुळे डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाच्या निमित्ताने त्यांच्या राजकीय आणि कौटुंबिक नातेसंबंधांचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच आघाडी कायम ठेवली.शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या प्रतापसिंह पाटील यांच्या विजयामुळे मराठवाड्यातील राजकीय समीकरणांनाही महत्त्व प्राप्त झालं आहे.

उद्धव ठाकरेंना दिवाळीत मोठा धक्का? विशाखा राऊत यांचे अपील फेटाळले, नगरसेवकपदाबाबत पुढे काय?

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचं व्यक्तिमत्त्व केवळ राजकारणापुरतं मर्यादित नाही. त्यांनी एमबीबीएसचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आहे. डॉक्टर म्हणून कारकीर्द घडवतानाच त्यांनी उद्योजकता आणि शिक्षण क्षेत्रातही काम केलं आहे. कळंब येथील श्री धनेश्वरी मानव विकास मंडळ, बीडमधील श्री भैरवनाथ निसर्ग मंडळ आणि राजलक्ष्मी फाउंडेशन अशा शैक्षणिक संस्थांशी त्यांचं नाव जोडलं गेलं आहे. या संस्थांच्या माध्यमातून मराठवाड्यात वैद्यकीय आणि उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात काम करण्यात आलं आहे. शिक्षण क्षेत्रातील हा विस्तार आणि त्यातून निर्माण झालेला सामाजिक संपर्क ही त्यांच्या सार्वजनिक जीवनातील महत्त्वाची बाजू मानली जाते.

डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वामागे त्यांच्या वडिलांचा, डॉ. वेदप्रकाश काशीराव पाटील अर्थात डॉ. व्ही. के. पाटील यांचा मोठा वारसा आहे. डॉ. व्ही. के. पाटील हे कृषी शिक्षण आणि विद्यापीठ प्रशासनातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि छत्तीसगडमधील इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ, रायपूर येथे त्यांनी कुलगुरूपदाची जबाबदारी सांभाळली होती. शिक्षण, कृषी क्षेत्र आणि सामाजिक कार्य यांमधील त्यांच्या योगदानामुळे पाटील कुटुंबाला मराठवाड्यात व्यापक ओळख मिळाली. त्यामुळे डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्यासाठी शिक्षण आणि सामाजिक संस्थांचं काम हे केवळ व्यावसायिक क्षेत्र नसून कौटुंबिक परंपरेचाही एक भाग असल्याचं दिसून येतं.

डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या राजकीय आणि कौटुंबिक ओळखीतील आणखी एक महत्त्वाचा दुवा म्हणजे त्यांचे सख्खे भाऊ डॉ. राहुल वेदप्रकाश पाटील. डॉ. राहुल पाटील हे परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं प्रतिनिधित्व करतात. दोन्ही भावांचं राजकीय पक्षीय व्यासपीठ वेगळं असलं, तरी त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी एकच आहे. एका बाजूला परभणीच्या राजकारणात सक्रिय असलेले आमदार राहुल पाटील, तर दुसऱ्या बाजूला शैक्षणिक क्षेत्रातून राजकीय मैदानात उतरलेले डॉ. प्रतापसिंह पाटील, या दोन भावांची राजकीय वाटचाल मराठवाड्यात चर्चेचा विषय ठरते.

संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; सुप्रीम कोर्टात हजर राहण्याचे आदेश, निखिल वागळेंची माफी स्वीकारली; नेमकं प्रकरण काय?

डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाच्या निमित्ताने चर्चेत आलेला आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे पंडित कुटुंबाशी असलेली त्यांची नातेसंबंधांची साखळी. माजी आमदार अमरसिंह पंडित आणि गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित हे राजन पाटील यांचे भाचे असल्याचं राजन पाटील यांनी सांगितलं आहे. परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांचाही त्यांनी आपल्या नात्यात उल्लेख केला आहे. राजन पाटील यांनी सांगितलेल्या नातेसंबंधांच्या या तपशिलातून मराठवाड्यातील राजकीय कुटुंबांमधील परस्पर संबंधांची व्याप्ती लक्षात येते. याशिवाय अंबडमधील विलासराव खरात, हिंगोलीतील गोरेगावकर कुटुंब आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह विविध राजकीय व्यक्तींशी नातेसंबंध असल्याचाही राजन पाटील यांनी उल्लेख केला आहे.

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा पदवीधर मतदारसंघातील विजय हा केवळ एका निवडणुकीचा निकाल नाही, तर त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीची, कौटुंबिक वारशाची आणि सार्वजनिक जीवनातील प्रवासाचीही चर्चा घडवणारा ठरला आहे. वडील डॉ. व्ही. के. पाटील यांचा शिक्षण क्षेत्रातील वारसा, भाऊ आमदार डॉ. राहुल पाटील यांचं राजकारणातील स्थान आणि राजन पाटील यांनी सांगितलेले विविध राजकीय कुटुंबांशी असलेले संबंध, या सगळ्या पार्श्वभूमीवर डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे आता मराठवाड्याचं लक्ष असेल. पदवीधर मतदारसंघातील विजयाचं रूपांतर ते आगामी काळात कोणत्या राजकीय आणि सामाजिक कामात करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Exit mobile version