ओबीसी समाजाच्या सवलती मराठा (Maratha) समाजाला मिळतील, मंत्रालयात मराठा समाजासाठी कुणबी मराठा कक्ष स्थापन केला जाई, हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्राचं उद्यापासून वाटप सुरू होईल, राज्यातील 58 लाख प्रमाणपत्र वाटप केले जातील या गोष्टींचं आश्वासन देताना हे महायुती सरकार मराठा समाजाच्या पाठीशी उभा आहे अशा शब्दांत भाजप नेते प्रसाद लाड यांनी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला. ते अंतरवाली सराटी येथे आंदोलनस्थळावरून बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज उपस्थित होता. त्याचबरोबर त्यांनी जरांगे पाटील यांना आपण उपोषण सोडावं अस आवाहनही केलं.
प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी बोलताना लाड यांनी म्हटले की, ‘दादा, मी विनंती करायला आलो आहे. मी पहिल्या दिवसापासून आपल्याला सांगतोय उपोषण करु नका. तुमच्या मनात जे आहे तेच होणार आहे. तुमचा विषय सोडवण्यासाठी आम्ही आहोत. काल रात्रीपासून मलाही झोप लागली नाही. डोळ्यात अश्रु आहेत. मी आज तुमचा भाऊ म्हणून आलोय. जरांगेंना साथ देण्यासाठी आलो आहे. त्यांच्या 15 मागण्याची उत्तर पाठवली होती. दादांना प्रशासनाशी बोलायचे नव्हते. त्यांच्या मोठ्या भावाच्या रुपाने आलो आहे.
….तर लगेच उपोषण सोडतो, मनोज जरांगेचा राज्य सरकारला शेवटचा अल्टिमेटम
पुढे बोलताना प्रसाद लाड यांनी म्हटले की, ‘आम्ही सगळे इथे आलो आहोत, आम्ही तत्काळ इथे निर्णय करणार आहोत. मी दादांना सांगितलं होतं की, नतद्रष्ट लोकांनी आरक्षण रद्द होण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती. पण फडणवीस आणि शिंदे सरकार पाठीशी आहे. साठे साहेब राज्याचे AG आहेत. हैदराबाद गॅझेट साठी आपण त्यांना उभं केलं आहे. शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की हे रद्द होऊ देणार नाही.’
त्यानंतर प्रसाद लाड यांनी म्हटले की, ‘राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींमंध्ये नोंदी लावल्या जाणार आहेत. जिल्हानिहाय पेन ड्राईव दिले आहेत. आपण 6 कोटी मराठे आहोत. आपण कमी नाही आहोत. अर्जदारांनी फक्त अर्ज करायला पाहिजे. अर्ज केला नाही तर प्रमाणपत्र कसं मिळणार? जिल्हानिहाय नोडल ऑफिसर नेमला आहे. मंत्रालयातही कक्ष स्थापण करत आहोत. हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र देण्याचे काम उद्या 12 वाजेपर्य़त सुरु करणार. पहिले प्रमाणपत्र दादांच्या हातातून देणार आहे. शिंदे-फडणवीस सरकार दादांच्या मागे उभे आहे.’
