एसआयआर प्रकरणानंतर मोठी राजकीय घडामोड, ज्ञानेश कुमारांविरोधात ‘महाभियोग’ प्रस्तावाची तयारी

ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यासाठी संसदेत नव्याने प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

Untitled Design   2026 09 24T200855.899

Untitled Design 2026 09 24T200855.899

impeachment motion against Gyanesh Kumar : एसआयआर प्रक्रियेसंदर्भात निवडणूक आयोगातील मतभेदांची माहिती समोर आल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत. काँग्रेससह विविध विरोधी पक्षांनी ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी केली असून, काही विरोधी नेत्यांनी त्यांच्या अटकेची तसेच निवडणूक प्रक्रियेची चौकशी करून निवडणुका पुन्हा घेण्याचीही मागणी केली आहे. आता ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यासाठी संसदेत नव्याने प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसने या मुद्द्यावर इतर विरोधी पक्षांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यासंदर्भातील प्रस्ताव आणण्यासाठी विरोधकांना एकत्र करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुढील काही दिवसांत यासंदर्भातील प्रस्तावाची सूचना संसदेत सादर केली जाण्याची शक्यता आहे. यापूर्वीही विरोधी पक्षांकडून ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली होती. एप्रिल 2026 मध्ये राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या खासदारांनी यासंदर्भातील निवेदन सादर केले होते.

ताज्या घडामोडींनंतर विरोधकांनी पुन्हा एकदा ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेस आता संसदेच्या दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षांना एकत्र आणून नव्याने प्रस्ताव मांडण्याच्या तयारीत आहे. मात्र मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्यासाठी संविधानाच्या कलम 324(5) अंतर्गत विहित संसदीय प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यामुळे प्रस्ताव आणल्यानंतर त्यासाठी आवश्यक असलेले संसदीय समर्थन मिळवणेही विरोधकांसमोरील महत्त्वाचा टप्पा असणार आहे.

आमच्याकडे पुरावे, देशद्रोह्यांना शिक्षा मिळणारचं, निवडणूक आयोगाच्या वादावरून राहुल गांधी मोदी-शहांना घेरलं

दरम्यान, एसआयआर प्रक्रियेदरम्यान मतदार याद्यांमधील नावे समाविष्ट करणे किंवा वगळणे तसेच काही प्रशासकीय निर्णयांबाबत निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी आक्षेप नोंदवल्याचे वृत्त समोर आले आहे. गेल्या दहा महिन्यांत दोन्ही आयुक्तांनी विविध निर्णय आणि आदेशांबाबत किमान 14 वेळा औपचारिक आक्षेप नोंदवल्याचे सांगितले जात आहे. यापैकी चार आक्षेप एकाच दिवशी नोंदवण्यात आल्याचीही माहिती आहे.

देशभरातील SIR प्रक्रिया तिन्ही निवडणूक आयुक्तांच्या देखरेखीखाली राबवण्यात आली असली, तरी काही निर्णय आपल्याला पुरेशी माहिती न देता घेण्यात आल्याचा मुद्दा दोन आयुक्तांनी उपस्थित केल्याचे वृत्त आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी तीव्र केली आहे.

अखेर 18 तासांनंतर भिंगारच्या गणरायांचे विसर्जन होणार! आमदार जगताप अन् पोलिसांच्या बैठकीनंतर तिढा सुटला

दुसरीकडे, निवडणूक आयोगाने आयोगामध्ये फूट असल्याचा अर्थ काढणे योग्य नसल्याची भूमिका मांडली आहे. विविध मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करणे, चर्चा करणे आणि मतभिन्नता व्यक्त करणे हा निर्णयप्रक्रियेचा भाग असल्याचे आयोगाचे म्हणणे आहे. एसआयआरसह महत्त्वाचे अंतिम निर्णय तिन्ही निवडणूक आयुक्तांच्या संमतीने घेण्यात आल्याची भूमिकाही आयोगाकडून मांडण्यात आली आहे.

त्यामुळे एसआयआरवरून सुरू झालेला राजकीय वाद आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीपर्यंत पोहोचला आहे. विरोधकांकडून संसदेत प्रत्यक्ष प्रस्ताव कधी सादर केला जातो आणि त्यानंतर या प्रकरणाला कोणते राजकीय तसेच संसदीय वळण मिळते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Exit mobile version