एमपीएससी आंदोलनावरुन पुण्यात राजकीय रणकंदन, महापौरांचं रोहित पवारांना थेट आव्हान

Pune MPSC Student Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरुन महापौर मंजुषा नागपुरे यांनी रोहित पवारांना थेट आव्हान दिलं आहे.

News Photo   2026 10 06T201439.980

Pune MPSC Student Protest

पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन (MPSC) सुरू असतानाच या प्रकरणाला आता न्यायालयीन वादाची किनार मिळाली आहे. आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, दुसरीकडे पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी आंदोलकांना थेट आव्हान दिलं आहे. महाराष्ट्रातील सर्व एमपीएससी विद्यार्थ्यांनी पुण्यात यावं आणि पुणे बंद पाडावं, असं आवाहन अभिजीत दिपकेंकडून करण्यात आल्यानंतर शहरातील वातावरण अधिक तापलं आहे.

आंदोलनाच्या माध्यमातून पुणे शहर बंद पाडण्याची भूमिका घेतल्याने महापौर मंजुषा नागपुरे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पुणे हे विद्येचं माहेरघर असून राज्यभरातून लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येतात, असं त्यांनी म्हटलं. पुण्यात शिक्षण घेतल्यानंतर अनेक विद्यार्थी याच शहरात स्थायिक झाले असून पुणेकर झाले आहेत. पुणे शहराने विद्यार्थ्यांना कायम मायेची उब दिली असून, विद्यार्थ्यांनीही आतापर्यंत पुणेकरांना त्रास होईल अशी भूमिका घेतली नाही, असं महापौरांनी स्पष्ट केलं.

विद्यार्थी पुणे बंद पाडतील आणि मंत्रालयावर धडकतील, रोहित पवारांचा सरकारला 2 दिवसांचा अल्टिमेटम

पुणे बंदच्या आवाहनावरुन महापौरांनी थेट आव्हान देत आक्रमक भूमिका घेतली आहे. पुणे बंद पाडून दाखवावं, असं आव्हान त्यांनी रोहित पवार यांना दिलं आहे. शहर बंद झाल्यास महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, रुग्णालयात जाणारे रुग्ण आणि सर्वसामान्य पुणेकरांना त्याचा फटका बसणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात आले आहेत, त्यांनी आंदोलनाच्या राजकारणात न अडकता आपल्या करिअरवर लक्ष द्यावं आणि राजकीय स्कोअर करण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर करणाऱ्या पक्षांच्या नादी लागू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी असलेले सर्वजण विद्यार्थीच आहेत का, असा सवालही मंजुषा नागपुरे यांनी उपस्थित केला आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे पुण्यात राहतात, त्यामुळे पुणे बंद पाडण्याची भूमिका त्यांना योग्य वाटते का, असा प्रश्न त्यांनी केला. विद्यार्थ्यांना आपल्या मागण्या मांडण्याचा आणि आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे, मात्र त्याचा त्रास पुणेकरांना होऊ नये एवढीच अपेक्षा असल्याचं महापौरांनी स्पष्ट केलं. आता महापौरांच्या या आव्हानावर रोहित पवार काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Exit mobile version