पुणे जिल्हा परिषद शाळांचा रोबोटिक्समध्ये डंका; 250 विद्यार्थ्यांची चमक, दोघांची दक्षिण कोरियासाठी निवड

Robotex India National Championship 2026 : पुणे जिल्ह्यातील 250 विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली.

News Photo   2026 11 25T184545.045

Robotex India National Championship 2026

Robotex India National Championship 2026 : पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील (Pune) विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स, कोडिंग आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे. रोबोटेक्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप 2026 मध्ये जिल्ह्यातील तब्बल 250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. करेगाव आणि लोणीकंद येथील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा प्रकारांत यश मिळवले असून, लोणीकंद जिल्हा परिषद शाळेतील दोन विद्यार्थ्यांची थेट दक्षिण कोरियातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या या कामगिरीमुळे जिल्हा परिषद शाळांमधील तंत्रज्ञान शिक्षणाची गुणवत्ता अधोरेखित झाली आहे.

करेगाव जिल्हा परिषद शाळेतील 56 विद्यार्थ्यांनी फियाटच्या सहकार्याने राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवला. यामध्ये सहा विद्यार्थ्यांच्या दोन संघांनी टॉप 10 मध्ये, तर तीन विद्यार्थ्यांच्या एका संघाने टॉप 3 मध्ये स्थान पटकावले. दुसरीकडे, झेडएस असोसिएट्सच्या सहकार्याने लोणीकंद शाळेतील 158 विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते. येथील 10 विद्यार्थ्यांच्या दोन संघांनी टॉप 10 मध्ये स्थान मिळवले. उद्योजकता आव्हान आणि फोक रेस या स्पर्धा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी विशेष कौशल्य दाखवत लक्ष वेधून घेतले.

लोणीकंद जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता सहावीचा विद्यार्थी श्रीराज अभिजित शिंदे आणि इयत्ता सातवीची विद्यार्थिनी आरोही रामचंद्र उजगरे यांची रोबोटेक्स इंटरनॅशनल चॅम्पियनशिप 2026 साठी निवड झाली आहे. 28 आणि 29 नोव्हेंबर रोजी दक्षिण कोरियातील सोल येथे ही स्पर्धा पार पडणार असून, या दोघांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. त्यांच्या निवडीमुळे लोणीकंदसह संपूर्ण पुणे जिल्ह्यातून आनंद व्यक्त केला जात आहे.

आकुर्डीत स्टार्टअपचा मंत्र! डी. वाय. पाटील फार्मसी कॉलेजमध्ये उद्योजकतेवर विशेष मार्गदर्शन

श्रीराज आणि आरोही यांनी उद्योजकता आव्हान या प्रकारासाठी ‘स्कोव्हेरा’ (Schovera) नावाचे बहुभाषिक ॲप विकसित केले आहे. विशेष म्हणजे इंटरनेट कनेक्शन नसतानाही हे ॲप कार्य करू शकते. शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवणे, विद्यार्थ्यांची सुरक्षा, शैक्षणिक माहिती आणि पालक-शिक्षक यांच्यातील संवाद अशा विविध सुविधा एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याची संकल्पना या ॲपमध्ये मांडण्यात आली आहे. याशिवाय फोक रेस आणि गर्ल्स फायर फायटिंग या रोबोटिक्स स्पर्धा प्रकारांतही हे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषद, शैक्षणिक संस्था आणि कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. फियाट आणि झेडएस असोसिएट्स यांच्या सहकार्यामुळे शाळांमध्ये रोबोटिक्स, कोडिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि एसटीईएम शिक्षणाच्या संधी उपलब्ध होत आहेत. रोबोटेक्स इंडिया (एज्युकेट टू एलिव्हेट ट्रस्ट) ही संस्था सरकारी आणि निमशहरी शाळांमधील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या कौशल्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम करत आहे.

या यशाबद्दल जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि जिल्हा परिषद अध्यक्ष विरधवल जगदाळे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, पायाभूत सुविधा आणि प्रोत्साहन मिळाल्यास ते राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही यश मिळवू शकतात, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. तंत्रज्ञानाधारित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, नवकल्पना आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित होत असून, जिल्हा परिषद शाळांमध्ये अशा संधींचा विस्तार करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version