पुण्यातील एमपीएससी सत्याग्रह आंदोलनाला राहुल गांधींचा जाहीर पाठिंबा, विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारला घेरलं

एमपीएससीमधील रखडलेल्या भरती प्रक्रिया आणि विविध गैरव्यवहारांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आता राष्ट्रीय पातळीवरूनही बळ मिळताना दिसत आहे.

Untitled Design   2026 10 04T074301.463

Untitled Design 2026 10 04T074301.463

Rahul Gandhi supports MPSC protest :पुण्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे एमपीएससीमधील कथित पेपरफुटी, रखडलेल्या भरती प्रक्रिया आणि विविध गैरव्यवहारांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आता राष्ट्रीय पातळीवरूनही बळ मिळताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘सत्याग्रह’ आंदोलनाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट दिल्यानंतर आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून आयोगातील ७० हजारांहून अधिक रिक्त पदे तातडीने भरणे, परीक्षा प्रक्रिया पारदर्शक करणे आणि भरती प्रक्रियेला गती देण्याची मागणी केली आहे. आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून राज्यभरातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांमध्येही या आंदोलनाबाबत तीव्र भावना व्यक्त होत आहेत. अनेक विद्यार्थी संघटना आणि विविध सामाजिक संघटनांनीदेखील आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.

यासंदर्भात राहुल गांधी यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, पुण्यातील छात्रों की गूँज कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी पेपरफुटी, रखडलेल्या भरत्या, महागडे शिक्षण, वसतिगृहांची दुरवस्था आणि डीबीटी योजनेतील त्रुटी यांसारख्या समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यावेळी राज्य सरकारला एमपीएससीमध्ये सुधारणा करून परीक्षा प्रक्रिया पारदर्शक करण्याचे आणि विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने विद्यार्थी आज सत्याग्रह आंदोलन करण्यास बाध्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.

आजोबा चार वेळा मुख्यमंत्री होते, कितीवेळ MPSC’साठी वेळ दिला?; पडळकरांचा रोहित पवारांना थेट सवाल

राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत त्यांना केवळ आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कृती हवी असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला युवक काँग्रेस आणि एनएसयूआय सातत्याने पाठिंबा देत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय न झाल्यास राज्यभरात असंतोष आणखी वाढू शकतो, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे निर्देश दिल्याचे सांगत राहुल गांधी यांनी, विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या संस्थांवरील विश्वास अबाधित राहणे आवश्यक असल्याचे नमूद केले. ज्या संस्थेवर लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अवलंबून आहे, त्या व्यवस्थेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व असणे गरजेचे आहे, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच हा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारसमोर मांडून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Exit mobile version