Rohit Pawar takes a dig at Fadnavis : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचा 3 हजार 271 मतांनी पराभव केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपुरात भाजपचा पराभव झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या निकालानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत दिलीत केलेल्या ट्विटचा संदर्भ देत जोरदार टोला लगावला आहे.
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत फडणवीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ते म्हणाले, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आपण स्वतः वैयक्तिक लक्ष घातलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात, ज्या ठिकाणी आपण स्वतः घरोघरी जाऊन बंडखोरांना माघार घेण्यासाठी मनवले, त्याच नागपूर मतदारसंघात, संघाचे मुख्यालय असलेल्या भागात भाजपला पराभव बघावा लागला, याचा अर्थ स्पष्ट आहे.
पुढे त्यांनी फडणवीसांच्या डिलीट केलेल्या ट्विटचा उल्लेख करत सत्तेच्या अहंकारावर निशाणा साधला. आपल्याला ट्विट डिलीट करावे लागले, याचे दुःख आहेच, पण आपल्या डिलीट झालेल्या ट्विटमध्ये दिसत असलेला सत्तेचा एवढा ईगो बरा नव्हे. असो, समजू शकतो. कदाचित निवडणूक बॅलेटवर झाली होती, याचा आपल्याला विसर पडला असावा, म्हणून आधीच ट्विट झाले असेल, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब,
आपण स्वतः वैयक्तिक लक्ष घातलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात, ज्या ठिकाणी आपण स्वतः घरोघरी जाऊन बंडखोरांना माघार घेण्यासाठी मनवले, त्याच नागपूर मतदारसंघात, संघाचे मुख्यालय असलेल्या भागात भाजपला पराभव बघावा लागला, याचा अर्थ स्पष्ट आहे……
आपल्याला ट्विट डिलीट करावे लागले, याचे दुःख आहेच; पण आपल्या डिलीट झालेल्या ट्विटमध्ये दिसत असलेला सत्तेचा एवढा ईगो बरा नव्हे. असो, समजू शकतो. कदाचित निवडणूक बॅलेटवर झाली होती, याचा आपल्याला विसर पडला असावा, म्हणून आधीच ट्विट झाले असेल…
विजयी उमेदवार अभिजित वंजारी यांचे अभिनंदन, मतदानरूपी आशीर्वाद देणाऱ्या पदवीधरांचे आभार, लढणाऱ्या सर्व उमेदवारांनादेखील शुभेच्छा!
@Dev_Fadnavis
@INCMaharashtra
@wanjarri— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 28, 2026
याच पोस्टमध्ये त्यांनी विजयी उमेदवार अभिजीत वंजारी यांचं अभिनंदन केलं. तसेच मतदानाच्या माध्यमातून आशीर्वाद देणाऱ्या पदवीधर मतदारांचे आभार मानत निवडणुकीत लढलेल्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. रोहित पवार आणि काँग्रेस नेत्यांच्या या टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमधील पराभवावर काय प्रतिक्रिया देणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघाची जागा जिंकण्यासाठी भाजपने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. पक्षसंघटनेने एकत्रितपणे काम केल्याचा दावाही करण्यात आला होता. भाजपमधील बंडखोरी रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेतला होता. त्यांनी बंडखोर अनिल सोले यांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी केली होती. निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांसारखे भाजपचे दिग्गज नेते मैदानात उतरले होते. पक्षाने सर्व स्तरांवर प्रयत्न करूनही नागपूरमध्ये पराभवाला सामोरं जावं लागल्याने या निकालाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी विजय मिळवला. त्यांनी भाजपचे सुधाकर कोहळे यांचा ३ हजार २७१ मतांनी पराभव केला. यात काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी 76 हजार 231 मतं मिळाली, भाजपच्या सुधाकर कोहळे यांना 63 हजार 960 मतं मिळाली तर, अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांना 25 हजार 909 मतं मिळाली. 3 हजार 271 मतांनी काँग्रेसचे अभिजित वंजारी यांचा या निवडणुकीत विजय झाला आहे.
राजन पाटील ठरले चार आमदारांचे मामा; मराठवाडा पदवीधर निवडणुकीत प्रतापसिंह पाटीलांच्या विजयानंतर राजकीय नातेसंबंधांची चर्चा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपुरात भाजपला पराभवाचा सामना करावा लागल्याने या निकालाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे. आता या पराभवावर भाजपचं नेतृत्व काय भूमिका मांडणार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांच्या टीकेला कसं प्रत्युत्तर देणार, याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे.
