Shraddha Kapoor Costume Design For Eetha Movie: ‘ईठा’ चित्रपटात पारंपरिक तमाशा कलावंताचा लूक अगदी अस्सल वाटावा, यासाठी श्रद्धा कपूरच्या प्रत्येक पेहरावाकडे बारकाईने लक्ष देण्यात आले. कॉस्च्युम डिझायनर शीतल शर्मा (Sheetal Sharma) यांनी खुलासा केला की, टीमने आधीच शिवलेल्या किंवा रेडीमेड नऊवारी साड्यांचा वापर न करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला होता. त्यामुळे डान्सच्या रिहर्सलदरम्यानही श्रद्धाने पारंपरिक पद्धतीने नेसलेली नऊवारी साडीच परिधान केली, जेणेकरून तिला या साडीची सवय व्हावी आणि तिचा सहज वावर होऊ शकेल.
या खास तयारीबद्दल बोलताना शीतल शर्मा यांनी एका प्रकाशनाला सांगितले, “श्रद्धा, लक्ष्मण सर, कोरिओग्राफर वैभवी मर्चंट आणि मी, आम्ही सगळेच या गोष्टीबाबत ठाम होतो की, आधीच नेसलेल्या साड्यांचा वापर करायचा नाही. कारण त्या खऱ्या वाटत नाहीत. कमरेच्या आणि बाजूच्या भागात त्यांचा पडण्याचा ढंग वेगळा असतो आणि त्या खूपच आखीव-रेखीव दिसतात. त्यामुळे श्रद्धा जेव्हा जेव्हा रिहर्सलला यायची, तेव्हा आम्ही तिला पारंपरिक पद्धतीने नऊवारी नेसवायचो, जेणेकरून तिला त्याची सवय होईल.”
श्रद्धा चित्रपटात तमाशा कलावंताची भूमिका साकारत असल्याने कॉस्च्युम टीमने केवळ नेहमीच्या महाराष्ट्रीयन कापडांपुरते स्वतःला मर्यादित ठेवले नाही. या पात्राचा कलेच्या क्षेत्रातील दर्जा आणि रुबाब लक्षात घेऊन खास वॉर्डरोब तयार करण्यात आला. पैठणी साड्यांसोबतच कर्नाटक, मध्य प्रदेश आणि कांचीपुरम येथूनही खास कापडं मागवण्यात आली. वेगवेगळ्या पारंपरिक विणकामांचा वापर करून त्यांना नऊवारी साड्यांचे स्वरूप देण्यात आले.
Eetha:श्रद्धा कपूरच्या गाण्यावर झाले सगळेच फिदा; ‘ईठा’ मधील ‘जी जी रे जी’ गाण्याला नादखुळा पसंती!
शीतल शर्मा यांनी हेही सांगितले की, अस्सलपणाचा हा ध्यास केवळ कपड्यांपुरता मर्यादित नव्हता, तर दागिने आणि नृत्यासाठी लागणाऱ्या साहित्याचीही तितकीच काळजी घेण्यात आली. डान्स सीक्वेन्ससाठी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी धातूच्या साखळ्यांना जोडलेले पारंपरिक घुंगरू वापरण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, घुंगरूंच्या प्रत्येक जोडीचे वजन तब्बल सहा किलो होते! कलाकार आणि संशोधकांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यांच्याकडून पारंपरिक तमाशा कलावंत नेमके कोणते दागिने आणि साजशृंगार वापरत असत, याची माहिती टीमने जाणून घेतली.
या संशोधनासाठी टीमने कोल्हापूर आणि पुण्यालाही भेट दिली. तिथे ज्येष्ठ तमाशा कलाकार आणि संगीतकारांशी संवाद साधत या लोककलेचा इतिहास आणि तिच्या भव्य, रंगतदार रंगमंचीय संस्कृतीचा जवळून अभ्यास केला. या भेटीदरम्यान ऐकलेल्या आठवणी सांगताना शीतल शर्मा म्हणाल्या, “आम्ही अशा कार्यक्रमांच्या गोष्टी ऐकल्या, जिथे तब्बल 14 हजार लोक उपस्थित होते आणि जागा अपुरी पडली होती. त्या काळातील तोच उत्साह, तोच जल्लोष आणि तीच रंगत पुन्हा एकदा पडद्यावर आणण्याची आमची इच्छा होती.”
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि दिनेश विजान, लक्ष्मण उतेकर व करिश्मा शर्मा निर्मित ‘ईठा’ हा चित्रपट 4 डिसेंबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
