कॉक्रोच जनता पार्टीला साथ देणारे सोनम वांगचुक प्रशासनाच्या कचाट्यात; आता थेट 60 दिवस नजरकैद

Sonam Wangchuk House Arrest : कॉक्रोच जनता पार्टीला साथ देणारे सोनम वांगचुक यांना प्रशासनाने लक्ष केलं आहे.

News Photo   2026 11 15T150925.015

Sonam Wangchuk House Arrest.

Sonam Wangchuk House Arrest :  लडाखमधील राजकीय आणि प्रशासकीय वातावरण तापले असतानाच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर प्रशासनाने निर्बंध लादले आहेत. लेहच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार वांगचुक यांना पुढील ६० दिवस नजरकैदेत ठेवण्यात येणार असून, या काळात त्यांना कोणत्याही रॅली किंवा सार्वजनिक आंदोलनात सहभागी होता येणार नाही. भारतीय न्याय संहितेच्या कलम १६३ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात अभिजीत दिपकेंना साथ देणाऱ्या वांगचुक यांच्याविरोधातील या निर्णयामुळे लडाखच्या राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे. विशेष म्हणजे, आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ही पावले उचलल्याने या कारवाईमागील कारणांवरही चर्चा सुरू झाली आहे.

लडाख नगरपरिषदेची निवडणूक ४ डिसेंबर रोजी होणार आहे. मात्र, निवडणुकीची वेळ आणि मतदानाचा कार्यक्रम यावर सोनम वांगचुक यांच्यासह काही स्थानिक संघटनांनी आक्षेप घेतला आहे. २०१९ मध्ये लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्यानंतर होणारी ही पहिली निवडणूक असल्याने तिचे विशेष महत्त्व आहे. डिसेंबर महिन्यात लडाखमध्ये कडाक्याची थंडी असते. त्यामुळे शिक्षण आणि रोजगारासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी तसेच कामगार राज्याबाहेर जातात. परिणामी, मतदानाच्या दिवशी अनेक मतदार आपल्या मतदारसंघात उपस्थित राहू शकणार नाहीत आणि त्यांचा मतदानाचा अधिकार बाधित होऊ शकतो, अशी भूमिका वांगचुक आणि स्थानिक संघटनांनी मांडली आहे.

Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

प्रशासनाकडून या आक्षेपांना उत्तर देताना लडाखचे मुख्य सचिव आशिष कुंद्रा यांनी मतदान प्रक्रियेत मतदारांना अडचण येऊ नये, यासाठी आवश्यक व्यवस्था केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मतदान केंद्रांवर हिटरची सोय करण्यात येईल, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था असेल, असे त्यांनी सांगितले. लडाखमधील शाळा साधारणपणे १५ ते १६ डिसेंबरदरम्यान सुरू होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वेळापत्रकाचा आणि थंडीचा विचार करून निवडणुका पुढे ढकलण्याची गरज नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. वेळेत निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यास जानेवारी ते मार्च या कालावधीत पुढील आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर करणेही शक्य होईल, असा युक्तिवाद कुंद्रा यांनी केला आहे.

दरम्यान, नजरकैदेच्या आदेशानंतर सोनम वांगचुक यांनी प्रशासनाच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या घराभोवती २० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून, पोलिसांनी आपल्याला घरातच राहण्याचा सल्ला दिल्याचे त्यांनी सांगितले. मी नजरकैदेत असून, प्रश्न विचारल्यामुळेच माझ्यावर अशी कारवाई करण्यात आल्याचा आरोपही वांगचुक यांनी केला आहे. एका बाजूला निवडणुका वेळेत घेण्यावर प्रशासन ठाम आहे, तर दुसरीकडे मतदानाच्या तारखेबाबत स्थानिक संघटनांचे आक्षेप कायम आहेत. अशा परिस्थितीत वांगचुक यांच्यावर घालण्यात आलेले ६० दिवसांचे निर्बंध आणि नगरपरिषद निवडणुकीचा वाद यामुळे लडाखमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Exit mobile version