दिवाळीआधी दलाल स्ट्रीटवर पैशांचा पाऊस! शेअर बाजारातील तेजीचे चार प्रमुख कारणे

Stock Market Rally : भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स 2,116 अंकांनी व निफ्टी 609 अंकांनी वधारला. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 8.20 लाख कोटींची वाढ.

Share Market Rally

Share Market Rally

Stock Market Rally : भारतीय शेअर बाजारात (Stock Market) दिवाळीआधीच मोठा धमका झालाय. गुरुवारी शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्सने ( SENSEX) तब्बल 2,100 अंकांची झेप घेतली, तर निफ्टीमध्ये तब्बल 2.5 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवण्यात आलीय. निफ्टीमध्ये सुमारे सहाशे अंकांनी वाढ नोंदविलीय. या जोरदार तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल 8.20 लाख कोटींची वाढ झालीय. या वाढीचे चार कारणे जाणून घेऊया….

गुरुवारी बीएसई सेन्सेक्सने 2,116.98 अंकांची म्हणजेच 2.74 टक्क्यांची वाढ नोंदवत 79,418.38 अंकांची पातळी गाठलीय. तर एनएसई निफ्टी 50 तब्बल 609 अंकांनी म्हणजे 2.50 टक्क्यांनी वाढून 24,570 अंकांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, भारतीय शेअर बाजारात सलग सहाव्या सत्रात तेजी कायम राहिली.

शेअर बाजारातील तेजीची चार प्रमुख कारणे
1) कच्चा तेलाच्या किमतीत मोठी घसरण
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने भारतीय शेअर बाजाराला मोठा आधार मिळाला. ब्रेंट क्रूडची किंमत 95 डॉलर प्रति बॅरलच्या आली आले आहे. तेलाच्या किंमती एका दिवसात नऊ टक्क्यांनी घटल्यात. तर अमेरिकेतील WTI क्रूड 90 डॉलरच्या खाली घसरले आहे. भारत मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात करतो. तेलाच्या किमती कमी होणे अर्थव्यवस्थेसाठी चांगले संकेत आहेत. त्यामुळे महागाई कमी होऊ शकते. तसेच कंपन्यांच्या उत्पादन खर्चात दिलासा मिळू शकतो.

2) अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीचा जागतिक बाजारावर परिणाम
अमेरिकेतील नोव्हेंबर 2026 च्या मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने सिनेट आणि प्रतिनिधी सभागृह या दोन्हींवर नियंत्रण मिळविले आहे. त्यामुळे जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवर आता अधिक राजकीय दबाव येण्याची शक्यता आहे. व्यापार आणि टॅरिफ धोरणांमध्ये अधिक संयमित भूमिका घेतली जाऊ शकते. तसेच अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील संघर्ष संपू शकतो. त्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांचा जोखीम घेण्याची कल वाढला आहे.

3) विदेशी गुंतवणूकदारांची भारतीय बाजारात पुन्हा खरेदी
भारतीय शेअर बाजारातील तेजीमागे विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची खरेदी हे महत्त्वाचे कारण ठरले आहे. बुधवारी विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात 7,284 कोटी रुपयांची खरेदी केली. नोव्हेंबर महिन्यात अवघ्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर्समध्ये सुमारे 17,235 कोटी रुपयांची गुंतवणूक केलीय. गेल्या काही महिन्यात विदेशी गुंतवणूकदार शेअर बाजारात पैसे काढून घेत होते. पुन्हा ते बाजारात परतले आहेत, ते बाजारासाठी चांगले संकेत आहेत.


4) रुपयाची डॉलरसमोर मजबुती

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयानेही मजबुती दाखवली. गुरुवारी रुपया 94.35 प्रति डॉलर या दोन आठवड्यांतील उच्चांकावर उघडला. त्यानंतर तो 94.32 प्रति डॉलरवर व्यवहार कर होता. डॉलर इंडेक्समध्येही घसरण झाल्याने भारतीय चलनाला आधार मिळाला. रुपयातील मजबुती आणि विदेशी गुंतवणुकीचा ओघ यामुळे बाजारातील सकारात्मक वातावरण आणखी मजबूत झाले.


बँकिंगसह सर्वच क्षेत्रांत तेजी

गुरुवारच्या तेजीमध्ये केवळ मोठ्या कंपन्यांचाच नव्हे, तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांचाही सहभाग होता. निफ्टी मिडकॅप 100 मध्ये 1.46 टक्के, तर निफ्टी स्मॉलकॅप 100 मध्ये 1.49 टक्क्यांची वाढ झालीय. क्षेत्रनिहाय पाहता निफ्टी प्रायव्हेट बँक 2.55 टक्क्यांनी वाढला. निफ्टी रियल्टी 1.92 टक्के, आयटी 1.72 टक्के, ऑटो 1.66 टक्के आणि कंझ्युमर ड्युरेबल्स 1.52 टक्क्यांनी वधारले. सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये बजाज फायनान्सने सर्वाधिक 5.33 टक्क्यांची वाढ नोंदवली. मारुती सुझुकी 4.94 टक्के, तर इंडिगो 4.88 टक्क्यांनी वधारले.
याशिवाय एशियन पेंट्स 4.39 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 3.89 टक्के आणि इन्फोसिस 3.67 टक्क्यांनी वाढले. टेक महिंद्रा, एचसीएल टेक, टीसीएस, आयसीआयसीआय बँक आणि बजाज फिनसर्व्हच्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली.

तेजी कायम राहणार की पुन्हा घसरण?
शेअर बाजारातील या जोरदार तेजीमुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, बाजारातील ही तेजी पुढील सत्रांमध्ये टिकून राहते का, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहेत. जागतिक घडामोडी, कच्च्या तेलाच्या किमती, विदेशी गुंतवणूकदारांची खरेदी आणि अमेरिकेतील धोरणात्मक बदल यांचा भारतीय शेअर बाजारावर पुढील काळातही परिणाम होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version