Stock Market Gain : भारतीय शेअर बाजारात शुक्रवारीला सुरुवातीच्या सत्रात मोठी घसरण झाली. त्यानंतर जोरदार रिकव्हरी झाली आहे. बाजार उघडताच सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीमध्ये (Nifty) मोठी घसरण झाली होती. मात्र, त्यानंतर गुंतवणूकदारांकडून झालेल्या जोरदार खरेदीमुळे बाजाराने पुन्हा उसळी घेतली. सेन्सेक्स दिवसाच्या नीचांकी पातळीवरून तब्बल 1,417 अंकांनी वधारून 83,919अंकांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. निफ्टीनेही दिवसाच्या नीचांकी पातळीवरून सुमारे चारशे अंकांची रिकव्हरी करत 25,800 अंकांची पातळी गाठलीय.
शुक्रवारी बाजारात सुरुवातीला विक्रीचा दबाव दिसून आला. सेन्सेक्स तब्बल 618 अंकांनी घसरून 82,403.27 अंकांवर आला होता. तर निफ्टीही 169 अंकांनी घसरून 25,345.20 अंकांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. मात्र, त्यानंतर बाजारात खरेदीचा जोर वाढल्याने दोन्ही निर्देशांकांनी दमदार पुनरागमन केले आहे. यापूर्वी गुरुवारीही भारतीय शेअर बाजारात चांगली तेजी पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स 989.94 अंकांनी म्हणजेच 1.21 टक्क्यांनी वाढून 83,021.75 अंकांवर बंद झाला होता. तर निफ्टी 286.35 अंकांनी म्हणजेच 1.14 टक्क्यांनी वधारून 25,514.30 अंकांवर बंद झाला होता. शुक्रवारी बाजारात झालेल्या या जोरदार रिकव्हरीमागे नेमकी कोणती कारणे आहेत? जाणून घेऊया चार
प्रमुख कारणे.
विजय सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका! कावेरीच्या 11 टीएमसी पाण्याची मागणी फेटाळली, कर्नाटकाला दिलासा
1) आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
शुक्रवारी आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली. एनएसईचा आयटी निर्देशांक सुमारे 2.4 टक्क्यांनी वधारला. पर्सिस्टंट सिस्टम्स, कोफोर्ज, टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचसीएल टेक आणि टीसीएस यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. आयटी क्षेत्रातील या सकारात्मक कामगिरीचा बाजारातील तेजीला मोठा आधार मिळाला.
यंदाच्या लग्नसराईत मोडणार सर्व रेकॉर्ड्स; देशभरात 25 दिवसांत होणार 52 लाख लग्न
2) परदेशी गुंतवणूकदारांकडून मोठी खरेदी
भारतीय शेअर बाजारातील तेजीमागे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची (FII) खरेदी हेही महत्त्वाचे कारण ठरले. उपलब्ध आकडेवारीनुसार, गुरुवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात तब्बल 7,411.41 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. दुसरीकडे, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) विक्रीचा मार्ग स्वीकारला. त्यांनी सुमारे 1,356 कोटी रुपयांचे शेअर्स विकले. मात्र, परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या मोठ्या खरेदीमुळे बाजारातील सकारात्मक वातावरणाला बळ मिळाले.
3) बँकिंग शेअर्समध्ये तेजी
बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये झालेली मोठी खरेदी हे बाजाराच्या रिकव्हरीमागील आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. शुक्रवारी बँक निफ्टीमध्ये सुमारे 2 टक्क्यांची वाढ झाली. एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक आणि आयसीआयसीआय बँक यांसारख्या प्रमुख बँकांच्या शेअर्समध्ये 8 टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आली. बँकिंग क्षेत्रातील या वाढीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीला मोठा आधार मिळाला.
4. डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत
भारतीय रुपयातील मजबुतीचाही बाजाराला फायदा झाला. शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात रुपया 17 पैशांनी मजबूत होऊन प्रति डॉलर 93.15 या पातळीवर पोहोचला. भारतीय शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदारांकडून झालेली खरेदी आणि प्रमुख जागतिक चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलर कमकुवत झाल्यामुळे रुपयाला बळ मिळाले आहे. विशेष म्हणजे, गुरुवारीही रुपयाने सलग चौथ्या सत्रात मजबुती नोंदवली होती. त्या दिवशी रुपया डॉलरच्या तुलनेत 9 पैशांनी वधारून 93.32 वर बंद झाला होता. रुपयातील या मजबुतीमुळे बाजारातील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढण्यास मदत झाली आहे. एकूणच आयटी आणि बँकिंग शेअर्समधील तेजी, परदेशी गुंतवणूकदारांची खरेदी आणि रुपयातील मजबुती या चार प्रमुख कारणांमुळे शुक्रवारी भारतीय शेअर बाजाराने सुरुवातीच्या घसरणीतून जोरदार पुनरागमन झाले आहे.
