मोठी बातमी! मुंढवा जमीन प्रकरणात नवा ट्विस्ट, सुनेत्रा पवारांच्या दोन निकटवर्तीयांना नोटिसा

Mundhwa Land Scam : मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात सुनेत्रा पवार यांच्या निकटवर्तीयांपर्यंत तपासाची व्याप्ती पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.

News Photo   2026 10 23T163818.864

Mundhwa Land Scam

Mundhwa Land Scam : पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात आता (DCM) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निकटवर्तीयांची चौकशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान आर्थिक गुन्हे शाखेने सुनेत्रा पवार यांच्या दोन सहकाऱ्यांना नोटिसा बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. संबंधित अधिकारी या नोटिसांना काय उत्तर देतात आणि तपासात कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नोटीस बजावण्यात आलेले दोन्ही अधिकारी सध्या सुनेत्रा पवार यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले जाते. हे दोघेही शासकीय सेवेत असून, पवार कुटुंबाच्या वैयक्तिक तसेच राजकीय कामांमध्ये त्यांचा सहभाग असल्याची माहिती आहे. मुंढवा जमीन व्यवहारात या अधिकाऱ्यांची भूमिका काय होती, याची तपास यंत्रणा पडताळणी करत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. यापूर्वी हे दोघे अजित पवार यांचे स्वीय सहायक म्हणून कार्यरत होते.

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही?, न्यायालयाचा पोलिसांना प्रश्न

मुंढवा येथील 40 एकर शासकीय जमिनीच्या व्यवहारात पुराव्यांशी छेडछाड झाल्याचा आर्थिक गुन्हे शाखेला संशय असल्याची माहिती समोर आली आहे. हा व्यवहार पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी कंपनीशी संबंधित आहे. या प्रकरणात पार्थ पवार यांना मदत करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि विजय कुंभार यांनी यापूर्वी केला होता. मात्र, या आरोपांबाबत तपासातून काय निष्पन्न होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या प्रकरणाशी संबंधित व्यक्ती आणि अधिकाऱ्यांमधील व्हॉट्सॲप संदेश तपास यंत्रणांच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संदेशांच्या आधारे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. मुंढवा जमीन व्यवहारात नेमकी कोणाची काय भूमिका होती, पुराव्यांशी छेडछाड झाली का आणि संबंधित अधिकाऱ्यांचा या व्यवहाराशी काय संबंध आहे, याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांच्या उत्तरांमधून आणि पुढील तपासातून कोणती माहिती समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.

Exit mobile version