तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! नाव-चिन्ह गोठवून ममता गटाला नवी ओळख

Trinamool Congress Split : या निर्णयामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात तृणमूल काँग्रेसच्या निवडणूक ओळखीसमोर नवं आव्हान निर्माण झालं आहे.

News Photo   2026 09 18T150900.542

The Election Commission changed the Trinamool Congress's symbol and name

पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसमधील (TMC) अंतर्गत वाद आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. पक्षातील फुटीनंतर दोन्ही गटांनी मूळ पक्ष आणि चिन्हावर दावा केला. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ‘ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ हे नाव आणि ‘फुले-गवत’ हे मूळ निवडणूक चिन्ह अंतरिम आदेशाद्वारे गोठवलं आहे. आगामी पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांना स्वतंत्र नाव आणि चिन्ह देण्याचा निर्णय आयोगाने घेतला.

आयोगाच्या निर्णयानंतर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ हे नाव आणि फुटबॉलपटू हे चिन्ह देण्यात आलं आहे. दुसरीकडे, ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘डेमोक्रेटिक तृणमूल काँग्रेस’ हे नाव आणि लिफाफा हे चिन्ह देण्यात आलं आहे. दोन्ही गटांना आगामी पोटनिवडणुकांसाठी या स्वतंत्र ओळखींचा वापर करावा लागणार आहे.

West Bengal bypolls: ममता बॅनर्जींसाठी नंदीग्राम मतदारसंघ पुन्हा का महत्त्वाचा ?

पक्षातील फुटीनंतर दोन्ही बाजूंनी आपणच खरी तृणमूल काँग्रेस असल्याचा दावा केला होता. या वादावर तोडगा काढण्यासाठी निवडणूक आयोगाने दोन्ही गटांशी चर्चा करून कागदपत्रे आणि दावे तपासले. मात्र अंतिम निर्णय होईपर्यंत मूळ पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणत्याही गटाला वापरता येणार नाही, अशी आयोगाची अंतरिम भूमिका आहे.

या निर्णयामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात तृणमूल काँग्रेसच्या निवडणूक ओळखीसमोर नवं आव्हान निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे आगामी पोटनिवडणुकांच्या आधीच हा निर्णय झाल्याने दोन्ही गटांना नव्या नाव आणि चिन्हासह निवडणूक रिंगणात उतरावं लागणार आहे. तृणमूल काँग्रेसमधील हा वाद आणि मूळ नाव-चिन्हाबाबतचा अंतिम निर्णय याकडे आता लक्ष लागलं आहे.

Exit mobile version