The headmaster bit the student : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी धक्कादायक घटना अहिल्यानगर शहराजवळील एका खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत उघडकीस आली आहे. इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या आठ वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेच्या मुख्याध्यापकांनी कथितपणे गळा दाबून हवेत उचलल्याचा आणि त्याच्या हाताला चावा घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक गौतम बहादुर्गे यांच्याविरोधात बालकांच्या संरक्षणासंदर्भातील कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आठ वर्षीय विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. त्यावेळी त्याच्या वर्गातील काही विद्यार्थ्यांमध्ये भांडण सुरू होते. ही बाब संबंधित विद्यार्थ्याने आपल्या वर्गशिक्षिका ज्योती मॅडम यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर वर्गशिक्षिकांनी शाळेचे मुख्याध्यापक गौतम बहादुर्गे यांना वर्गात बोलावले. मुख्याध्यापक वर्गात आल्यानंतर त्यांनी भांडण करणाऱ्या विद्यार्थ्यांना समज देण्यास सुरुवात केली. मात्र, याचवेळी त्यांनी संतापाच्या भरात संबंधित आठ वर्षीय विद्यार्थ्याला लक्ष्य केल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, भांडण कसे करतात ते मी दाखवतो, असे म्हणत त्यांनी विद्यार्थ्याचा गळा पकडला आणि त्याला हवेत उचलून धरले.
त्यानंतर त्यांनी एक ते वीसपर्यंत आकडे मोजत जवळपास वीस सेकंद मुलाला त्या अवस्थेत ठेवले. एवढ्यावरच न थांबता खाली सोडल्यानंतर विद्यार्थ्याच्या हाताला चावा घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे. शाळेतून घरी परतल्यानंतर विद्यार्थ्याने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्याच्या शरीरावरील खुणा आणि मानसिक धक्का पाहून कुटुंबीय हादरले. त्यांनी तातडीने मुलाला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर विद्यार्थ्याच्या पालकांनी शाळेशी संपर्क साधून या प्रकाराबाबत जाब विचारला.
मोठी बातमी : राज्यसभेत सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर; राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवणार
विद्यार्थ्याचे वडील सोनल शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, फोनवर झालेल्या संभाषणात मुख्याध्यापकांनी ही घटना घडल्याची कबुली देत ती चुकून घडल्याचे सांगितले. तसेच लेखी स्वरूपात माफी मागण्याची तयारी दर्शवत पालकांचा पत्ता मागितल्याचाही दावा करण्यात आला आहे. मात्र, एवढ्या लहान मुलाशी अशा प्रकारे वागणे हा गंभीर गुन्हा असून संबंधित मुख्याध्यापकांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
या घटनेची माहिती समोर आल्यानंतर परिसरातील पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याच्या नावाखाली शारीरिक किंवा मानसिक छळ केला जाऊ शकत नाही, अशी भूमिका अनेक पालकांनी घेतली आहे. शाळेत मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या व्यक्तीकडूनच असा प्रकार घडल्याचा आरोप होत असल्याने शैक्षणिक क्षेत्रातही या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, नगर तालुका पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. शाळेतील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले जाणार असून, वैद्यकीय अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या घटनेमुळे शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षक-विद्यार्थी संबंधांमधील संवेदनशीलतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
