Ticket fare structure for Hinjawadi to Shivajinagar Metro announced : पुणेकरांसाठी मोठी बातमी, हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो अखेर सुरू होण्यासाठी सज्ज झाली असून, या मेट्रोचे तिकीट दरही जाहीर करण्यात आले आहेत. या मेट्रोने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना किमान 12 रुपये, तर कमाल 62 रुपये मोजावे लागणार आहेत. 0 ते 2 किलोमीटर अंतरासाठी 12 रुपये, 2 ते 4 किलोमीटरसाठी 25 रुपये, 4 ते 8 किलोमीटरसाठी 37 रुपये, 8 ते 12 किलोमीटरसाठी 43 रुपये, 12 ते 18 किलोमीटरसाठी 49 रुपये, तर 18 ते 23 किलोमीटर अंतरासाठी 62 रुपये तिकीट आकारले जाणार आहे. प्रवाशांना ऑनलाइन ॲप, क्यूआर कोड तसेच तिकीट काउंटरवरून तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 3 नोव्हेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने या मेट्रोचे लोकार्पण होणार असून, 4 नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू होणार आहे. बालेवाडी येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर असा 23 किलोमीटरचा हा मेट्रो मार्ग असून, त्यावर एकूण 23 स्थानके आहेत. सुरुवातीला 17 स्थानके प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार असून, उर्वरित 6 स्थानके जानेवारीपर्यंत सुरू होणार आहेत.
मान्सून संपला, तरी पावसाचा धोका कायम; 21 राज्यांना वादळी पावसाचा इशारा
या मेट्रोची सेवा सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजून 40 मिनिटांपर्यंत उपलब्ध असेल. गर्दीच्या वेळेत दोन मेट्रोमधील अंतर अवघे 6 मिनिटे, तर गर्दी नसलेल्या वेळेत 12 मिनिटे असणार आहे. आधुनिक सीबीटीसी कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सिग्नलिंग प्रणालीचा वापर या मेट्रोमध्ये करण्यात आला आहे. तसेच 750 व्होल्ट डीसी थर्ड रेल प्रणालीद्वारे मेट्रोला विद्युत पुरवठा केला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत दररोज 6.60 मेगावॅट सौरऊर्जेची निर्मिती होणार असून, मेट्रोच्या एकूण ऊर्जेच्या 30 टक्के गरज सौरऊर्जेतून भागवली जाणार आहे.
या मेट्रोचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मार्गावरील सर्व मेट्रो गाड्यांचे सारथ्य महिला ट्रेन पायलट करणार आहेत. त्याशिवाय स्थानक नियंत्रक, तिकीट कर्मचारी आणि स्थानक अटेंडंटसह सुमारे 50 टक्के स्थानक कर्मचारी महिलाच असणार आहेत. सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचा भूसंपादन आणि विविध सेवा सुविधांच्या स्थलांतरासह अंदाजित खर्च 8 हजार 313 कोटी रुपये इतका आहे. राष्ट्रीय मेट्रो रेल धोरण 2017 अंतर्गत अशा स्वरूपात राबविण्यात आलेला हा देशातील पहिलाच प्रकल्प असल्याचे सांगितले जात आहे. पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या माहितीनुसार, या मेट्रोने दररोज अंदाजे 2 ते अडीच लाख प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे. त्यामुळे हिंजवडी आयटी पार्कसह पुण्यातील प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होण्याची अपेक्षा आहे.
