लग्नानंतर अवघ्या महिन्यातच सुरू झाला विवाहितेचा छळ; शिक्षक सासरा आणि सरपंच सासूच्या त्रासाला कंटाळून संपवलं जीवन

सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या अमानवीय छळाला कंटाळून एका उच्चशिक्षित विवाहित महिलेने आपले जीवन संपवल्याची घटना घडली आहे. दीप्ती मगर-चौधरी असं या विवाहितेचं नाव असून ती पेशाने इंजिनिअर होती.

Thumb 21

Thumb 21

Pune Uruli Kanchan Married Woman Dipti Magar Suicide: उरुळी कांचनजवळील सोरतापवाडी गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या अमानवीय छळाला कंटाळून एका उच्चशिक्षित विवाहित महिलेने आपले जीवन संपवल्याची घटना घडली आहे. दीप्ती मगर-चौधरी असं या विवाहितेचं नाव असून ती पेशाने इंजिनिअर होती.

दीप्ती मगर-चौधरी या उच्चशिक्षित, स्वावलंबी आणि विवाहित महिला होत्या. मात्र शिक्षण, नोकरी आणि कर्तृत्व असूनही कौटुंबिक छळापासून त्यांची सुटका झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सासरच्या मंडळींकडून वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. वंशाला दिवा हवा, या मानसिकतेतून दीप्तीवर सक्तीने गर्भपात करण्याचा दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. याशिवाय माहेरून पैसे आणण्यासाठी सतत तगादा लावला जात होता. या सर्व छळामुळे दीप्ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचली होती, असं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दीप्ती आणि रोहन चौधरी यांचा विवाह 23 नोव्हेंबर 2029 रोजी थेऊर येथे पार पडला होता. मात्र लग्नानंतर अवघ्या महिनाभरातच दीप्तीला सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे जावे लागले. तक्रारीनुसार, पती रोहन चौधरी याने दीप्तीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली होती. तसेच तिच्या रूपावरून आणि घरकामाच्या क्षमतेवरून तिला कमी लेखले जात होते. “तू दिसायला चांगली नाहीस”, “तुला स्वयंपाक किंवा घरकाम जमत नाही”, अशा शब्दांत वारंवार अपमान केला जात होता. शेतात काम करणाऱ्या महिलांशी तिची तुलना करत तिला मानसिक दबावाखाली ठेवले जात असल्याचे आरोप तक्रारीत नमूद करण्यात आले आहेत.

या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, दीप्तीची सासू सुनीता चौधरी या गावाच्या विद्यमान सरपंच आहेत, तर सासरे कारभारी चौधरी हे व्यवसायाने शिक्षक आहेत. समाजात प्रतिष्ठेची पदं भूषवणाऱ्या व्यक्तींवरच गंभीर आरोप झाले आहेत. मृत विवाहितेची आई हेमलता मगर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी दीप्तीचा पती रोहन चौधरी, सासू सुनीता चौधरी, सासरे कारभारी चौधरी आणि दीर रोहित चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी सोरतापवाडी, तालुका हवेली येथील रहिवासी आहेत.

व्यवसाय आणि वाहनासाठी पैशांचा तगादा; माहेरकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप

दीप्तीला पहिली मुलगी झाल्यानंतर सासरच्या मंडळींचा असंतोष अधिकच वाढल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पती रोहन याने आपला एक्सपोर्टचा व्यवसाय तोट्यात गेल्याचे कारण पुढे करत दीप्तीच्या माहेरून 10 लाख रुपयांची मागणी केली. मुलीच्या संसाराला तडा जाऊ नये, म्हणून आई-वडिलांनी ही रक्कम दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

मात्र यानंतरही पैशांची मागणी थांबली नाही. लग्नात चारचाकी गाडी दिली नसल्याचा मुद्दा उपस्थित करत, पुन्हा एकदा मोठ्या रकमेची मागणी करण्यात आली. अखेरीस दीप्तीच्या कुटुंबीयांनी तिचा संसार टिकावा या उद्देशाने तब्बल 25 लाख रुपये रोख स्वरूपात दिल्याचा आरोप आहे.

स्त्रीधन बळकावल्याचा गंभीर आरोप

लग्नावेळी दीप्तीला माहेरून सुमारे 50 तोळे सोन्याचे दागिने स्त्रीधन म्हणून देण्यात आले होते. तक्रारीनुसार, ग्रामीण भागात चोरीची भीती असल्याचे कारण सांगून सासू आणि पतीने हे सर्व दागिने स्वतःकडे घेतले. नंतर या दागिन्यांबाबत विचारणा केली असता, ते व्यवसायासाठी बँकेत गहाण ठेवल्याचे दीप्तीला सांगण्यात आल्याचे समोर आले आहे.

‘वंशाला दिवा हवा’: जबरदस्तीने गर्भपात केल्याचा आरोप

या प्रकरणातील सर्वात गंभीर आणि माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार नोव्हेंबर 2025 मध्ये घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. दीप्ती पाच महिन्यांची गर्भवती असताना, सासरच्या मंडळींनी तिला गर्भलिंग निदान चाचणी करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. पोटातील बाळ मुलगी असल्याचे समजताच, “आम्हाला मुलगाच हवा” असे सांगून दीप्तीचा विरोध डावलत तिचा जबरदस्तीने गर्भपात करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेनंतर दीप्ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हुंडाबळी, गर्भलिंगभेद आणि कौटुंबिक हिंसाचारासारख्या प्रकरणांमध्ये कायदे कडक असतानाही अशा घटना पुन्हा पुन्हा समोर येत आहेत, हे समाजासाठी गंभीर चिंतेचं कारण आहे. दीप्तीचा मृत्यू हा केवळ एका कुटुंबाचा नाही, तर संपूर्ण समाजाचं अपयश आहे. उच्च शिक्षण, नोकरी आणि प्रगती करत असूनही एका महिलेला सुरक्षित आयुष्य आणि सन्मान मिळत नसेल, तर प्रश्न फक्त कायद्याचा नाही, तर मानसिकतेचाही आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांकडून पुढील कारवाई केली जात आहे. मात्र अशा घटनांमधून एकच प्रश्न पुन्हा समोर येतो—महिलांना नेमकं सुरक्षित कधी वाटणार?

Exit mobile version