Yuzvendra Chahal BJP : क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फिरकी (Cricket) गोलंदाजीने भल्याभल्या फलंदाजांना अडचणीत आणणारा भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आता राजकीय कारणामुळे चर्चेत आला आहे. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय ओबीसी मोर्चाच्या नव्या कार्यकारिणीत चहलला विशेष आमंत्रित सदस्य म्हणून स्थान दिले आहे. 21 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या या कार्यकारिणीत त्याच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे क्रिकेटनंतर चहलची राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.
भाजपच्या राष्ट्रीय ओबीसी मोर्चाच्या नव्या टीममध्ये विविध व्यक्तींना वेगवेगळ्या जबाबदार्या देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये युजवेंद्र चहलची विशेष आमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. या पदामुळे त्याला संघटनेच्या बैठका आणि विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाऊ शकते. मात्र, त्याच्याकडे नेमकी कोणती जबाबदारी सोपवली जाणार आहे आणि या पदाचा कार्यकाळ किती असेल, याबाबत पक्षाकडून अद्याप सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.
IND vs NZ : भारताचे जोरदार पुनरागमन! राहुल-जायसवालची दमदार फलंदाजी; 10 वर्षांनंतर मोडला ‘हा’ विक्रम
विशेष आमंत्रित सदस्य म्हणजे संघटनेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी विशिष्ट व्यक्तीला दिलेले स्थान होय. अशा सदस्यांना संघटनेच्या बैठका आणि कार्यक्रमांसाठी निमंत्रित केले जाते. मात्र, त्यांचे अधिकार, कार्यक्षेत्र आणि जबाबदार्या या संबंधित संघटनेच्या नियमांनुसार ठरतात. चहलच्या बाबतीतही सध्या केवळ कार्यकारिणीतील विशेष आमंत्रित सदस्य म्हणून निवड झाल्याची माहिती समोर आली आहे. याचा अर्थ त्याने सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे किंवा भाजपकडून निवडणूक लढवणार आहे, असा होत नाही.
युजवेंद्र चहल हा भारताचा प्रसिद्ध लेग स्पिन गोलंदाज असून, वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. लेग स्पिन आणि गुगलीच्या जोरावर त्याने अनेक दिग्गज फलंदाजांना चकित केले आहे. आयपीएलमधील कामगिरीमुळेही त्याने क्रिकेटविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता भाजपच्या राष्ट्रीय ओबीसी मोर्चाच्या कार्यकारिणीत स्थान मिळाल्याने चहलच्या क्रिकेट कारकिर्दीपलीकडील नव्या भूमिकेची चर्चा रंगू लागली आहे.
