तुम्ही जर सोशल मीडिया युजर असाल तर त्यावर येणाऱ्या जाहिरातीला तुम्ही कायमच वैतागलेले असता. या जाहिरातीपासून वाचण्यासाठी तुमच्याकडे काही पर्यायही नसतो. यावर आता ट्विटरकडून नवा पर्याय दिला जाणार आहे. ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी नुकतंच एका ट्विटमध्ये याची माहिती दिली आहे.
इलॉन मस्क यांनी गेल्या वर्षी ट्विटर विकत घेतल्यापासून यामध्ये अनेक बदल केले आहेत. सुरुवातीपासून ते एका बाजूला युजर्स एक्सपिरियन्स सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे ते ट्विटरचे उत्पन्न वाढवण्याचाही विचार करत आहे. यासाठी त्यांनी ट्विटरवर अनेक नवीन फीचर्स जोडले आहेत.
यामध्ये ट्विटरकडून जाहिरातींपासून वाचण्यासाठी नवे सबस्क्रिप्शन मॉडेल सुरु केले जाणार आहे. इलॉन मस्क यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे.
Ads are too frequent on Twitter and too big. Taking steps to address both in coming weeks.
— Elon Musk (@elonmusk) January 21, 2023
इलॉन मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “ट्विटरवरील जाहिरातींची साईज आणि फ्रीक्वेंसी खूप मोठी आहे. येत्या आठवड्यात दोन्ही कमी करण्यासाठी ठोस पावलं उचलली जात आहेत. तसेच, आम्ही अधिक किमतीचे सबस्क्रिप्शन मॉडेल लॉन्च करणार आहोत. जेणेकरून कोणत्याही जाहिराती येणार नाहीत.”
मस्क यांनी नेहमीप्रमाणे आणखी एका फिचरची घोषणा केली असली तरी या जाहिराती कमी करण्यासाठी काय केलं जाईल किंवा नव्या मॉडेलची किंमत काय असेल? याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. लवकरच याची माहिती येईल अशी अपेक्षा आहे.