Download App

सावधान! ‘या’ पदार्थात असतं नसांना ब्लॉक करणारं कोलेस्ट्रॉल, यामुळेच येतो हृदयविकाराचा झटका

  • Written By: Last Updated:

सध्याच्या धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांच्या खाण्याच्या सवयी बिघडताहेत. आणि यामुळं लोक सतत नवीन आजारांना बळी पडत आहेत. सतत खाण्या-पिण्याच्या चुका करत राहिल्याने उच्च रक्तदाब (High blood pressure) आणि हृदयविकाराचा (Heart disease)  धोका वाढतो, तसेच शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही वाढतं. कोलेस्ट्रॉल (Cholesterol) अनेक कारणांसाठी माणसाच्या शरीरासाठी आवश्यक असतं. परंतु शरीरात कोलेस्ट्रॉलच्या वाढत्या प्रमाणामुळे आपल्याला हृदयासंबंधी अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक झाल्यास ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होते. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होते. परिणामी, हार्ट अटॅकचा (Heart attack) धोकाही निर्माण होतो. दरम्यान, कोणत्या पदार्थात सर्वांत जास्त कोलेस्ट्रॉल असतं? कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय करावं? याच विषयी जाणून घेऊ.

कोलेस्ट्रॉल म्हणजे काय?

खरंतर कोलेस्ट्रॉल शरीरात महत्त्वाची भूमिका बजावते. हा पदार्थ निरोगी पेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक असतो. मात्र, शरीरातील कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणाला मर्यादा असते आणि ती ओलांडल्यास शरीराचे मोठे नुकसान होऊ शकते. आजच्या काळात हाय कोलेस्ट्रॉलची समस्या खूप वाढली आहे आणि कमी वयोगटातील लोकही या आजाराला बळी पडत आहेत. कोलेस्ट्रॉल हा मेणासारखा पदार्थ असतो, जो रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतो. रक्ताच्या नसांमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यामुळे ब्लॉकेजची समस्या उद्भवू शकते. वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे शरीरातील रक्ताभिसरण थांबू शकते.

कोलेस्ट्रॉलची लक्षणे काय आहेत?

नेहमी थकवा जाणवणे, उलट्या, रक्तदाबात अचानक वाढ, छाती दुखणे, शरीराच्या खालच्या भागात थंडपणा या सारखी लक्षणे ही सहसा कोलेस्ट्रॉल वाढल्याचेच संकेत देतात. कोलेस्ट्रॉल वाढल्याने रक्त वाहिन्या म्हणजेच रक्ताच्या नसांमध्ये अडथळा निर्माण होतो. आणि त्यामुळे शरीरातील रक्त प्रवाह हा स्लो होतो.

कोलेस्ट्रॉल हृदयासाठी धोकादायक
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याने हृदयविकाराचा झटका, कार्डियाक अरेस्ट आणि स्ट्रोक सारख्या अनेक जीवघेण्या आजारांचा धोकाही वाढतो. उच्च कोलेस्टेरॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होते. हे साठे एकतर धमन्यांमधून रक्तप्रवाह रोखतात किंवा तुटतात आणि रक्तप्रवाहात गुठळ्या तयार करतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.

तुपामध्ये असते सर्वात जास्त बॅड कोलेस्ट्रॉल

NHS ने जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार, सॅच्युरेटेड फॅटच्या यादीत तूप पहिल्या स्थानावर आहे. कारण, त्यात ५० टक्क्यांहून अधिक सॅच्युरेटेड फॅट असते, जे खराब कोलेस्ट्रॉल बनवते. १४ ग्रॅम तुपात सुमारे ९ ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट असते. काय बसला ना तुम्हाला सुद्धा धक्का? तुम्ही जे तूप रोज मिटक्या मारून खाता त्याची ही आहे वाईट बाजू, जी फार कमी लोकांना माहित आहे. म्हणूनच डॉक्टर सुद्धा तुपाचं मर्यादित सेवन करण्याचाच सल्ला देतात.

आता तुम्ही म्हणाल तूप एवढे घातक आहे मग,

तूप खावं की नाही?

तर मंडळी, हे सर्व सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट एवढे लक्षात ठेवा. सॅच्युरेटेड फॅट व्यतिरिक्त तुपात हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, प्रोटीन यांसारखे पोषक घटक असतात, जे शरीरासाठी आवश्यक असतात. म्हणूनच आहारातून तूप पूर्णपणे काढून टाकणे योग्य नाही. तुम्ही दररोज मर्यादित प्रमाणात तूप खाऊन बॅड कोलेस्ट्रॉल नियंत्रित करू शकता. १९ ते ६४ वयोगटातील निरोगी पुरुष दिवसाला ३० ग्रॅम सॅच्युरेटेड फॅटचे सेवन करू शकतात. तर याच वयाच्या स्त्रिया एका दिवसात २० ग्रॅम सॅच्युरेटेड फॅटचे सेवन करू शकतात.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय करावं?

रोजच्या जेवणात मीठ असो वा साखर, दोन्हीचे सेवन संतुलित प्रमाणात केले पाहिजे. तुमच्या आहारात दूध, चीज आणि दही, फळे, भाज्या आणि पातळ मांस यांचा समावेश करा, ज्यामध्ये मीठ आणि साखर फारच कमी प्रमाणात आढळते. या सर्व गोष्टी डोळे, हृदय आणि किडनीसाठी देखील फायदेशीर मानल्या जातात. दारू असो वा धूम्रपान, या दोन्ही गोष्टी रक्तवाहिन्यांना इजा करतात. धुम्रपानामुळे रक्तपेशींमध्ये रक्तप्रवाह गतिमान होतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. संशोधकांना असे आढळून आले की, ही सवय सोडल्याने अनेक शारीरिक आणि मानसिक आरोग्य समस्या सुधारू शकतात. धूम्रपान सोडल्यानंतर तीन महिन्यांत तुमचे रक्‍ताभिसरण आणि फुफ्फुसाचे कार्य सुधारू लागते. धूम्रपान सोडल्याने कोलेस्टेरॉलची पातळी वाढण्यापासून रोखता येते. अल्कोहोलचे सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. त्यामुळे स्त्री-पुरुषांनी जास्त प्रमाणात दारू पिऊ नये.

 

Disclaimer / डिस्क्लेमर : वरील माहिती संकलित माहितीवर आधारित आहे. त्यामुळे कुठलाही प्रयोग करण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे आहे.

Tags

follow us