Birds Fear Women Scientific Study Reveals : पक्षी माणसांना पाहून उडून जातात, हे आपण अनेकदा पाहतो. मात्र, पक्षी पुरुष आणि महिलांना पाहून वेगवेगळी प्रतिक्रिया देत असतील, तर? वाचून आणि ऐकून थोडं आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. एका आंतरराष्ट्रीय संशोधनातून असंच काहीसं समोर आलं आहे. ब्रिटिश इकोलॉजिकल सोसायटीच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या आंतरराष्ट्रीय संशोधनात ही बाब समोर आली आहे. या अभ्यासानुसार, पक्षी पुरुषांच्या तुलनेत महिलांना पाहून अधिक लवकर उडून जातात. विशेष म्हणजे, पुरुषांना ते महिलांच्या तुलनेत सरासरी एक मीटर अधिक जवळ येऊ देतात. युरोपमधील वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि पक्ष्यांच्या विविध प्रजातींमध्ये दिसलेला हा समान कल संशोधकांसाठी कुतूहलाचा विषय ठरला आहे. त्याबद्दल जाणून घेऊया…
पाच देशांतील 37 पक्षीप्रजातींचा अभ्यास
ब्रिटिश इकोलॉजिकल सोसायटीच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या आंतरराष्ट्रीय संशोधनात चेकिया, फ्रान्स, जर्मनी, पोलंड आणि स्पेन या देशांतील शहरी पक्ष्यांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात पक्ष्यांच्या 37 प्रजातींचा समावेश होता. या प्रजातींमध्ये माणसांच्या हालचालींमुळे सहज सावध होणाऱ्या मॅगपाय पक्ष्यांपासून ते शहरांमध्ये माणसांच्या आसपास सहज वावरणाऱ्या कबुतरांपर्यंत अनेक पक्ष्यांचा समावेश होता. संशोधकांना या विविध प्रजातींमध्ये एक समान कल दिसून आला आणि तो म्हणजे पुरुष जवळ येत असताना पक्षी तुलनेने अधिक वेळ थांबत होते, मात्र महिला जवळ येताच ते लवकर उडून जात होते.
पक्षी महिलांना पाहून अधिक सावध का होतात?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, पक्षी महिलांना पाहून अधिक सावध का होतात? तर, पक्षी पुरुष आणि महिलांमधील फरक ओळखू शकतात, असा निष्कर्ष संशोधकांनी नोंदवला आहे. मात्र, ते कसं त्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तसेच, महिलांच्या चालण्याची पद्धत, शरीराची ठेवण, हालचाली, कपडे किंवा इतर काही दृश्य संकेत पक्ष्यांच्या प्रतिक्रियेवर परिणाम करतात का?, याबाबतही ठोस उत्तर संशोधनात मिळालेलं नाही.
वैज्ञानिकांनाही वर्तनाचं कोडं उलगडेना
पण, या अभ्यासात सहभागी असलेले अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एंजेलिसचे प्राध्यापक डॅनियल ब्लमस्टीन यांनी संशोधनाचे निष्कर्ष ठोस असल्याचं म्हटलं आहे. वेगवेगळ्या देशांतील पक्ष्यांच्या वर्तनात एकसारखा कल दिसल्यामुळे हा फरक केवळ योगायोग असल्याचं मानणं कठीण असल्याचं संशोधकांचं निरीक्षण आहे. मात्र, पक्षी नेमके कोणते संकेत ओळखतात आणि महिलांना पाहून ते अधिक सावध का होतात, याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. तर, दुसऱ्याबाजूला संशोधनातील चेक युनिव्हर्सिटी ऑफ लाइफ सायन्सेस प्रागच्या डॉ. यानिना बेनेडेट्टी यांनीही या निष्कर्षांमुळे माणूस आणि पक्ष्यांच्या परस्परसंवादाबद्दलच्या समजुतींना नवं आव्हान मिळाल्याचं नमूद केलं आहे. शहरांमध्ये राहणारे पक्षी माणसांकडे कसं पाहतात, याचा अभ्यास शहरी पर्यावरणशास्त्रासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
पक्ष्यांच्या वर्तनातून काय समोर आलं?
या संशोधनात पक्षी एखादी व्यक्ती जवळ येत असताना किती अंतरावरून उडून जातात, हे मोजण्यात आलं. या मोजमापाला वैज्ञानिक भाषेत फ्लाइट इनिशिएशन डिस्टन्स (Flight Initiation Distance) असं म्हणतात. अभ्यासानुसार, महिलांच्या बाबतीत हे अंतर सरासरी 8.5 मीटर, तर पुरुषांच्या बाबतीत 7.5 मीटर इतकं होतं. म्हणजेच पक्षी महिलांना तुलनेने अधिक अंतरावरून टाळताना दिसले. या निष्कर्षाचा अर्थ सर्व पक्षी प्रत्येक महिलेला पाहून उडतात किंवा महिलांनाच घाबरतात, असा काढता येऊ शकत नाही. कारण हा विविध पक्ष्यांच्या निरीक्षणांत दिसलेला एकूण कल आहे. त्यामागची कारणं समजून घेण्यासाठी आणखी अभ्यास करावा लागणार आहे. पण एकूण या संशोधनाचा प्राथमिक अर्थ काढायचा म्हटलं तर, पक्षी माणसांमधील काही फरक ओळखत असावेत, असेच संकेत या संशोधनातून मिळतात. पण ते नेमकं काय ओळखतात आणि त्यांच्यावर नेमका कोणत्या गोष्टींचा प्रभाव पडतो, हे कोडं अद्याप वैज्ञानिकांनाही उलगडणं बाकी आहे.
