What Is Cyberdeck Computers : तंत्रज्ञान विश्वात सध्या एका नव्या आणि रंजक ट्रेंडने धुमाकूळ घातला आहे. ‘सायबरडेक’ (Cyberdeck) नावाच्या या कस्टमाइज्ड पोर्टेबल कॉम्प्युटरने केवळ Gen Z तरुणांनाच नाही, तर तंत्रज्ञानप्रेमींनाही भुरळ घातली आहे. हे केवळ एक गॅजेट नसून, डिजिटल जगातील ‘स्वातंत्र्य’ आणि ‘सर्जनशीलतेचे’ नवे प्रतीक बनले आहे. नेमकं ‘सायबरडेक’ काय आणि याची एवढी क्रेझ का? त्याबद्दल जाणून घेऊया…
काय आहे ‘सायबरडेक’?
सामान्यतः आपण बाजारातून तयार लॅपटॉप खरेदी करतो, परंतु ‘सायबरडेक’ची संकल्पना पूर्णपणे वेगळी आहे. हा असा पोर्टेबल कॉम्प्युटर आहे जो यूजर्स स्वतःच्या गरजेनुसार विविध हार्डवेअर भाग जोडून तयार करतात. यामध्ये छोटी स्क्रीन, कीबोर्ड, बॅटरी, प्रोसेसर आणि अन्य आवश्यक घटक स्वतःच्या आवडीनुसार निवडले जातात. यामुळेच प्रत्येक ‘सायबरडेक’चा लूक आणि कार्यक्षमता दुसऱ्यापेक्षा पूर्णपणे वेगळी असते. हे कॉम्प्युटर दिसायला सायन्स फिक्शन चित्रपटांमधील भविष्यकालीन उपकरणांसारखे वाटतात.
सायबरपंक जगातून थेट वास्तवात
‘सायबरडेक’ ही संकल्पना 19984 मध्ये विल्यम गिब्सन यांच्या ‘न्यूरोमँसर’ या प्रसिद्ध सायन्स फिक्शन कादंबरीतून जन्माला आली. त्या काळातील काल्पनिक हॅकिंग उपकरणांनी प्रेरित होऊन आजचे तरुण हे गॅजेट प्रत्यक्ष साकारत आहेत. सुरुवातीला केवळ पुस्तके आणि चित्रपटांत दिसणारी ही कल्पना आता ‘सायबरपंक’ संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनली आहे.
Cyberdeck ने कोणती-कोणती कामे केली जाऊ शकतात?
सायबरडेक हे कॉम्प्युटर केवळ दिसायला आकर्षक नाहीत, तर ते अत्यंत उपयुक्तही आहेत. प्रोग्रामर्स, सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आणि सायबर सुरक्षा तज्ज्ञ यांचा वापर कोडिंग, नेटवर्क टेस्टिंग आणि एथिकल हॅकिंगसाठी करत आहेत. याशिवाय, ऑफलाइन वाचन, संगीत ऐकणे, गेमिंग आणि सामान्य कंप्यूटिंगसाठी हे गॅजेट अत्यंत प्रभावी ठरत आहे. यात अनावश्यक ॲप्स किंवा युजरला ट्रॅक करणारी सिस्टिम नसल्यामुळे यूजर्सना पूर्ण तांत्रिक स्वातंत्र्य मिळते.
घरी बनवता येतो का Cyberdeck?
‘सायबरडेक’ बनवणे आता खूप सोपे झाले आहे. रास्पबेरी पाय (Raspberry Pi) सारख्या स्वस्त आणि लहान सिंगल बोर्ड कॉम्प्युटरचा वापर करून अनेक तरुण घरीच हे तयार करत आहेत. इंटरनेटवर उपलब्ध असलेले हजारो ट्यूटोरियल या नवीन तंत्रज्ञानासाठी मार्गदर्शक ठरत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर हे व्हिडिओ प्रचंड लोकप्रिय होत आहेत.
एआय युगात साइबरडेकचा वाढता ट्रेंड
आजच्या इंटरनेट युगात प्रत्येक प्लॅटफॉर्म एआय (AI) आणि अल्गोरिदमवर आधारित आहे. अशा वातावरणात, तंत्रज्ञानावर पुन्हा आपले नियंत्रण मिळवण्याच्या इच्छेतून तरुण ‘सायबरडेक’कडे वळत आहेत. यामध्ये युजरला स्वतःच्या आवडीचे सॉफ्टवेअर आणि फीचर्स ठेवण्याचे स्वातंत्र्य मिळते. जुन्या इंटरनेट युगातील ती वैयक्तिक आणि प्रयोगात्मक ओळख पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न यातून केला जात आहे. थोडक्यात काय तर, ‘सायबरडेक’ हा केवळ एक कॉम्प्युटर नसून, तो डिजिटल युगातील एक वैयक्तिक स्टेटमेंट आणि तंत्रज्ञानाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन आहे.
