गेले दोन दिवस हे सर्वसामान्यांना दिलासा देणार आहेत. (Gold) कारण या दोन दिवसांमध्ये सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. ही घसरण पाहिल्यानंतर ज्यांना सोने खरेदी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाल्याचे समोर आले आहे.
सोन्याच्या दरात 1 हजार 500 रुपयांची घसरण तर चांदीच्या दरात 4 हजारांची घसरण झाली आहे. आज, 8 जून रोजी 10 ग्रॅम सोन्याचे भाव जीएसटीसह 1 लाख 53 हजार 985 रुपयांवर पोहोचले आहेत. तर एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 52 हजार 350 रुपयांवर आले आहेत. दोन दिवसात सोन्याच्या दरात 5 हजार 500 रुपयांची मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही 15 हजारांची घसरण झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण
जागतिक बाजारात सोमवारी सोन्याच्या दरात देखील सलग दुसऱ्यांदा घसरण झाली आहे. अमेरिकेत व्याज दर दीर्घकाळ उच्च राहण्याची शक्यता असल्यानं गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणुकीपासून दूर जात आहेत स्पॉट गोल्डमध्ये 0.2 टक्के घसरण होऊन 4,321.49 डॉलर प्रति औंसवर आले आहेत. शुक्रवारी सोन्याच्या दरात तीन टक्के घसरण झाली आहे. 24 मार्चनंतर सोन्याचे दर निचांकी पातळीवर पोहोचले होते.
ऑगस्टच्या डिलिव्हरीच्या अमेरिकन गोल्ड फ्यूचर्समध्ये कमजोरी दिसून आली. या शेअरमध्ये 0.5 टक्क्यांनी घसरुन 4345.60 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे महिन्यात देशातील नागरिकांनी वर्षभरात सोने खरेदी करु नये असं आवाहन केलं होतं. यानंतर सराफा व्यावसायिकांकडून देशवासियांना जुनं सोनं जमा करुन नवं सोनं खरेदी करावं म्हटलं होतं. त्यामुळे ग्राहकांनी जुने सोने मोडण्यास सुरुवात केल्यानं बाजारातील सोने वाढले आहे.
