आता वीजबिल भरणं झालं आणखी सोप्पं! व्हॉट्सअपने आणलं नवं फीचर; जाणून घ्या सविस्तर

WhatsApp new feature सर्व बिल्स भरण्यासाठी व्हॉट्स अॅपने एक खास फीचर आणलं आहे. हे फीचर नेमकं कसं आहे? जाणून घ्या सविस्तर...

WhatsApp New Feature

WhatsApp New Feature

Paying electricity bills become even easier WhatsApp introduced new feature : प्रत्येक महिन्यामध्ये घरातील सर्वांत महत्त्वाच्या गोष्टींचे बिल्स भरण्यासाठी आपण प्रचंड वेळ खर्च करतो किंवा मेहनत करतो. मात्र आता घरातील वीजबिल असो किंवा पानी, गॅस किंवा इतर कुठलेही बिलं भरण्यासाठी आता तुम्हाला वेगवेगळे अॅप्स किंवा वेबसाईटवर ओढाताण करण्याची गरज नसणार आहे. कारण हे सर्व बिल्स भरण्यासाठी व्हॉट्स अॅपने एक खास फीचर आणलं आहे. हे फीचर नेमकं कसं आहे? जाणून घ्या सविस्तर…

व्हॉट्सअपचे नवीन फीचर काय आहे?

व्हॉट्सअॅपने आता बिल पेमेंट्स (Bill Payments) हे नवीन फीचर उपलब्ध करून दिले आहे. हे फीचर भारत कनेक्ट (BBPS) नेटवर्कवर काम करते. याच्या माध्यमातून वापरकर्त्यांना तब्बल 30 वेगवेगळ्या श्रेणींमधील 22,722 बिलर्सची सुविधा मिळणार आहे. यामध्ये वीज बिल, पाणी बिल, गॅस बिल, फास्टॅग रिचार्ज, विमा हप्ता, क्रेडिट कार्ड बिल तसेच कर्जाचे हप्ते यांसारख्या अनेक सेवांचा समावेश आहे. कंपनीच्या मते, या सुविधेमुळे व्हॉट्सअॅपच्या विद्यमान पेमेंट सेवांचा विस्तार होणार आहे. यापूर्वी अॅपवर मोबाईल रिचार्ज आणि इतर आर्थिक व्यवहारांच्या सुविधा उपलब्ध होत्या.

व्हॉट्सअपवरून बिल कसे भराल?

व्हॉट्सअॅपद्वारे बिल भरण्यासाठी सर्वप्रथम अॅप उघडावे लागेल. त्यानंतर होम स्क्रीनवरील रुपयाच्या चिन्हावर टॅप करावे. पुढे आपल्या गरजेनुसार बिलाची श्रेणी आणि संबंधित बिलर निवडावा लागेल. त्यानंतर ग्राहक क्रमांक किंवा अकाउंटशी संबंधित आवश्यक माहिती भरून ती निश्चित करावी. माहिती भरल्यानंतर बिलाची रक्कम आपोआप स्क्रीनवर दिसेल. बिलाची रक्कम आणि इतर तपशील तपासल्यानंतर वापरकर्ते UPI, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट करू शकतील.

एकाच ठिकाणी अनेक बिलांचे व्यवस्थापन

या नव्या फीचरमध्ये हाऊसहोल्ड बिल्स समरी चा पर्यायही देण्यात आला आहे. यामध्ये पूर्वी भरलेल्या बिलांची माहिती दिसेल, त्यामुळे पुढील वेळी संबंधित बिलर सहजपणे एका टॅपमध्ये निवडता येईल. तसेच एकाच बिलरशी संबंधित अनेक अकाउंट्सचे व्यवस्थापन करण्याची सुविधाही उपलब्ध असेल. Payments Home स्क्रीनवर लोकप्रिय बिलांच्या श्रेणी दिसतील. तर सी ऑल या पर्यायाद्वारे 20 हून अधिक विविध बिल श्रेणी पाहता येणार आहेत.

सर्वांना एकाच वेळी मिळणार नाही सुविधा

व्हॉट्सअॅपचे हे नवीन बिल पेमेंट्स फीचर सध्या सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध झालेले नाही. कंपनी टप्प्याटप्प्याने भारतातील वापरकर्त्यांसाठी ही सुविधा सुरू करत आहे. येत्या काही आठवड्यांत Android आणि iOS वापरकर्त्यांच्या मोठ्या वर्गापर्यंत हे फीचर पोहोचण्याची शक्यता आहे.

Exit mobile version