iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max ची भारतातील विक्री 18 सप्टेंबरपासून सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी Apple स्टोअर्सबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मुंबईतील Apple BKC स्टोअरबाहेर नवीन iPhone खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पहिल्याच दिवशी फोन हातात घेण्याची उत्सुकता तरुणांमध्ये विशेषतः पाहायला मिळाली. सोशल मीडियावरही स्टोअरबाहेरील गर्दीचे अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत.
याच गर्दीत सुरतहून थेट मुंबईत आलेल्या एका iPhone चाहत्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. नवीन iPhone लॉन्चच्या दिवशीच खरेदी करण्याचा त्याने निर्धार केला होता. त्यामुळे त्याने सुरत ते मुंबई असा तब्बल 5 ते 6 तासांचा प्रवास केला. मुंबईत पोहोचल्यानंतर तो थेट बीकेसीतील Apple BKC स्टोअरबाहेर पोहोचला. मात्र, मुंबईत आल्यानंतरही त्याची प्रतीक्षा संपली नाही.
iPhone 17 खरेदी करता येणार फक्त 34,355 रुपयांत! जाणून घ्या सर्वात भारी ऑफर
स्टोअरबाहेर आधीपासूनच ग्राहकांची मोठी रांग लागली होती. या तरुणानेही रांगेत आपला नंबर लावत तब्बल 10 ते 12 तास प्रतीक्षा केली. अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर अखेर त्याला नवीन iPhone खरेदी करण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे त्याने iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max हे दोन्ही फोन खरेदी केलं. फोन हातात आल्यानंतरचा त्याचा उत्साह व्हिडिओत स्पष्टपणे पाहायला मिळतो. पहिल्याच दिवशी फोन घेण्याचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर त्याने आनंद व्यक्त केला.
या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर iPhoneच्या नव्या मॉडेल्सची तरुणाईमध्ये असलेली क्रेझ पुन्हा चर्चेत आली आहे. मोठी किंमत असूनही पहिल्याच दिवशी फोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी केलेली धडपड लक्षवेधी ठरली. मुंबईसह दिल्ली, नोएडा आणि बंगळुरूमधील Apple स्टोअर्सबाहेरही मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. त्यामुळे iPhone 18 Pro सीरिजच्या लॉन्चला ग्राहकांचा मिळालेला प्रतिसाद चर्चेचा विषय ठरला आहे.
