Download App

SAP मध्ये होणार नोकरकपात, 3000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढणार

जर्मन सॉफ्टवेअर दिग्गज असलेल्या SAP या कंपनीत जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील टाळेबंदीच्या लाटेत सामील होऊन यावर्षी सुमारे ३ हजार नोकऱ्या कमी करण्याची योजना आखली आहे. पारंपारिक सॉफ्टवेअर आणि क्लाउड-आधारित संगणकीय सेवा दोन्ही ऑफर करणार्‍या या कंपनीने सांगितले आहे की, कंपनीचा मुख्य व्यवसाय मजबूत करण्यासाठी आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी कंपनीने ही योजना आखली आहे. त्यातून कंपनीची पुनर्रचना केली जाण्याची शक्यता आहे.

२०२२ च्या कंपनीच्या आर्थिक ताळेबंद असलेल्या अहवालात म्हटले आहे की, कंपनीच्या या धोरणाने सुमारे २.५ टक्के कर्मचार्‍यांवर परिणाम होऊ शकणार आहे. SAP कडे जगभरात सुमारे १ लाख २० हजार कर्मचारी आहेत, याचा अर्थ सुमारे ३ हजार नोकऱ्या कमी करण्याची योजना आहे.

मेटा, अ‍ॅमेझॉन, गुगल, आयबीएम आणि मायक्रोसॉफ्ट या तंत्रज्ञान क्षेत्रात असलेले दिग्गज कंपन्यांनी आर्थिक मंदीमुळे कर्मचारी कपातीचे पाऊल उचलले आहे. गेल्या ६ महिन्यांच्या काळात या कंपन्यांतून मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यानंतर आता एसएपी कंपनीनेही कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे.

कंपनीने म्हटले आहे की, कर्मचारी कमी झाल्यामुळे कंपनीचा २५० ते ३०० दशलक्ष युरोची बचत होणार आहे. तर २०२३ च्या पहिल्या तिमाहीत पुनर्रचनेमुळे २०२४ पासून वार्षिक ३००-३५० दशलक्ष युरोची बचत होण्याची अपेक्षा आहे. ते पैसे कंपनीच्या धोरणात्मक वाढीच्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूकीसाठी वापरले जाणार आहे. एसएपीला मूळ क्लाउड व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळणार आहे, असेही कंपनीने सांगितले आहे. २०२२ मध्ये SAP ने ३०.९ अब्ज युरोचा महसूल मिळवला जाणार आहे. जो एका वर्षापूर्वीच्या तुलनेत ११ टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीचा ऑपरेटिंग नफा २०२१ च्या तुलनेत २ टक्क्यांनी कमी, फक्त ८ अब्ज युरोवर आला. २०२३ मध्ये SAP ला ऑपरेटिंग नफ्यात १० ते १३ टक्के वाढीची अपेक्षा आहे.

Tags

follow us