WhatsApp Introduces Guest Calls Feature Know About It : WhatsApp वर कॉल करण्यासाठी आता प्रत्येकाकडे अकाउंट असण्याची गरज राहणार नाही. कारण, आता WhatsApp ने ‘गेस्ट कॉलिंग’ हे नवं फीचर सादर केलं आहे. यामुळे WhatsApp वापरत नसलेल्या व्यक्तीलाही कॉल लिंक शेअर करून ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉलमध्ये सहभागी करून घेता येणार आहे. विशेष म्हणजे, या कॉलसाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही, वेळेची मर्यादाही नसेल आणि संभाषण सुरक्षित ठेवण्यासाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शनची सुविधाही मिळेल. नेमकं हे फीचर काय? ते कसं काम करणार? त्याबद्दल सोप्या शब्दांत समजून घेऊया…
WhatsApp चं गेस्ट कॉलिंग फीचर कसं काम करणार ?
या फीचरचा वापर करण्यासाठी WhatsApp अकाउंट असलेल्या व्यक्तीला अॅपमधील Calls टॅबमध्ये जाऊन ‘+’ आयकॉनवर टॅप करावं लागेल. त्यानंतर कॉल लिंक तयार करून ती संबंधित व्यक्तीला शेअर करता येईल. या लिंकच्या मदतीने WhatsApp अकाउंट नसलेली व्यक्तीही कॉलमध्ये सहभागी होऊ शकेल. लिंक मिळाल्यानंतर गेस्ट यूजरला कम्प्युटरच्या ब्राउजरमध्ये ती उघडावी लागेल. त्यानंतर स्वतःचं नाव नोंदवून कॉलमध्ये सहभागी होण्यासाठी विनंती पाठवता येईल. मात्र, केवळ लिंक उघडल्याने थेट कॉलमध्ये प्रवेश मिळणार नाही.
कॉलमध्ये प्रवेश देण्याचा अधिकार होस्टकडे
गेस्ट यूजरने कॉलमध्ये सहभागी होण्यासाठी विनंती पाठवल्यानंतर त्याला वेटिंग रूममध्ये थांबावं लागेल. कॉल सुरू करणाऱ्या होस्टची मंजुरी मिळाल्यानंतरच त्याला प्रवेश मिळेल. होस्टला गरजेनुसार कोणत्याही गेस्टला कॉलमधून बाहेर काढण्याचाही अधिकार असेल. गेस्ट यूजर्सना कॉलमधील इतर सहभागी यूजर्सचे फोन नंबर पाहता येणार नाहीत. तसेच, त्यांना मेसेजही पाठवता येणार नाहीत किंवा स्वतःहून दुसऱ्या व्यक्तीला कॉलमध्ये जोडता येणार नाही. त्यामुळे कॉलवरील नियंत्रण होस्टकडेच राहणार आहे.
एका कॉलमध्ये 32 जणांना होता येणार सहभागी
WhatsApp च्या या फीचरमध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल दोन्हींचा पर्याय असेल. एका कॉलमध्ये गेस्टसह जास्तीत जास्त 32 जण सहभागी होऊ शकतील. कॉलसाठी कोणतीही निश्चित वेळमर्यादा नसेल आणि हे कॉल मोफत करता येतील. कॉलमध्ये सहभागी झाल्यानंतर स्क्रीन शेअरिंग, थम्ब्स-अप किंवा हार्टसारखे इमोजी पाठवणे आणि बोलण्यासाठी हात वर करण्यासारखे पर्यायही उपलब्ध असतील. त्यामुळे ऑनलाइन क्लास, ऑफिस मीटिंग, ग्रुप चर्चा किंवा एकत्र काम करताना या फीचरचा उपयोग होणार आहे.
Google Calendar आणि Outlook शीही जोडले जाणार
WhatsApp यावर्षीच्या अखेरपर्यंत Google Calendar आणि Outlook सोबत कॅलेंडर इंटिग्रेशन आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी संबंधित WhatsApp प्लगइन इन्स्टॉल करून अकाउंट कनेक्ट करता येईल. त्यानंतर कॅलेंडरमधून थेट कॉल लिंक तयार करण्याची सुविधा मिळू शकते. यामुळे मीटिंगचं नियोजन करताना प्रत्येक सहभागीला WhatsApp अकाउंट असण्याची अट राहणार नाही. कॅलेंडर इव्हेंटद्वारे आमंत्रित केलेल्या व्यक्तींनाही गेस्ट म्हणून कॉलमध्ये सहभागी होता येईल.
WhatsApp ने यापूर्वीही कॉलिंग सुविधांमध्ये अनेक बदल केले आहेत. WhatsApp Web वरून ब्राउजरमध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करण्याची सुविधा, सुरू असलेला ग्रुप कॉल एका डिव्हाइसवरून दुसऱ्यावर ट्रान्सफर करण्याचा पर्याय आणि व्हिडिओची गुणवत्ता सुधारण्यासाठी QuickHD यांसारखी फीचर्स सादर करण्यात आली आहेत. त्यानंतर आता गेस्ट कॉलिंगमुळे WhatsApp अकाउंट नसलेल्या व्यक्तींनाही कॉलमध्ये सहभागी करून घेणं सोपं होणार आहे. मात्र, कॉल लिंक तयार करण्यासाठी WhatsApp अकाउंट आवश्यक असेल आणि गेस्टला प्रवेश देण्याचा अंतिम निर्णय होस्टकडेच राहणार आहे.
