Now Your Digital Signature Will Saved Directly On Mobile Phone : स्मार्टफोन यूजर्सचा अनुभव अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर करण्यासाठी Google आणखी एक नवे फीचर घेऊन येत आहे. या फिचरमुळे तुमची स्वाक्षरी फोनमध्येच सेव्ह होणार आहे. Google चं ‘Signatures’ नावाचं ॲप नेमकं काय? त्याबद्दल जाणून घेऊया…
नेमके काय आहे Google चे ‘Signatures’ ॲप?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे ॲप यूजर्सना डिजिटल स्वाक्षरी तयार करणे, ती सुरक्षित ठेवणे आणि गरजेनुसार वापरणे अधिक सोपे करणार आहे. यामध्ये स्वाक्षरी तयार करण्यासाठी अनेक पर्याय दिले जाणार आहेत. या फिचरमध्ये यूजर्स स्क्रीनवर बोटाने किंवा स्टायलसने थेट स्वाक्षरी करू शकतात. आधीपासून असलेल्या स्वाक्षरीचा फोटो अपलोड करू शकतात. तसेच स्वतःचे नाव टाइप करून विविध फॉन्ट स्टाइलमध्ये डिजिटल स्वाक्षरी तयार करू शकतात. याशिवाय, एकापेक्षा जास्त स्वाक्षऱ्या सेव्ह करून वेगवेगळ्या कामांसाठी त्यांचा वापर करण्याचाही पर्याय मिळणार आहे. सध्या हे फिचर टप्प्याटप्प्याने काही Android स्मार्टफोन्सवर उपलब्ध होत असून, भविष्यात अधिक यूजर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
यूजर्सना काय फायदा होणार?
हे ॲप आल्यामुळे महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी प्रत्येक वेळी नवीन स्वाक्षरी तयार करण्याची गरज भासणार नाही. फोनमध्ये सुरक्षितपणे सेव्ह केलेली स्वाक्षरी आवश्यकतेनुसार वापरता येणार आहे. त्यामुळे वेळ वाचेल, काम अधिक सोयीचे होईल आणि थर्ड-पार्टी ॲप्सवर अवलंबून राहण्याची गरजही कमी होईल.
‘Signatures’ ॲप कसे वापरता येईल?
ज्या स्मार्टफोनमध्ये जून 2026 चा Google Play System Update इंस्टॉल असेल, त्या यूजर्सना हे फीचर मिळू शकते. यासाठी…Settings मध्ये जाऊन Google Play System Update तपासा. नवीन अपडेट इंस्टॉल करा. यानंतरही हे ॲप थेट ॲप ड्रॉव्हरमध्ये दिसणार नाही. याच्या वापरासाठी Activity Launcher सारख्या ॲपच्या मदत घ्यावी लागेल. ‘Signature’ हे नाव शोधल्यानंतर तुम्हावा वेगवेगळे पर्याय दिसतील. ज्यांच्या मदतीने तुम्ही नवीन स्वाक्षरी तयार करू शकता किंवा आधीपासूनच सेव्ह असलेली स्वाक्षरी मॅनेज करू शकता.
‘Signatures’ ॲप अजून पूर्ण तयार नाही
सध्या हे ॲप सुरुवातीच्या टप्प्यात आहे. त्यामुळे यूजर्स स्वाक्षरी तयार करणे, सेव्ह करणे, एडिट करणे किंवा डिलीट करणे इतकीच कामे करू शकतात. पुढील अपडेट्समध्ये आणखी सुविधा जोडल्या जाण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, हे फीचर सध्या काही Google Pixel, Samsung आणि OnePlus स्मार्टफोन्समध्ये दिसू लागले आहे. विशेष म्हणजे, हे कोणत्याही Android व्हर्जन अपडेटऐवजी Google Play System Update द्वारे उपलब्ध करून दिले जात आहे.
