पुणे : माजी आमदार विजय शिवतारे यांची बारामती लोकसभा मतदारसंघात तळपत असलेली तलवार म्यान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) मावळमध्ये शिवसेनेचे (Shivsena) काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवतारे (Vijay Shivtare) हे बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचा धर्म पाळत नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत बेताल, शिवराळ भाषेत बोलत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना आहे. शिवतारे यांनी अजित पवारांची जाहीर माफी मागावी. जोपर्यंत ते माफी मागणार नाहीत, माघार घेणार नाहीत, तोपर्यंत आम्ही मावळ लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असा इशारा पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी दिला. (former MLA Vijay Shivtare in Baramati Lok Sabha Constituency, NCP decided not to work for Shiv Sena in Maval.)
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, फजल शेख हे नेते या वेळी उपस्थित होते. यावेळी गव्हाणे म्हणाले, की अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये आहे. महायुती म्हणून लोकसभा निवडणुकीला एकत्रित सामोरे जायचे आहे. महाराष्ट्रातून महायुतीच्या 45 जागा निवडून आणण्यासाठी आम्ही काम करत आहोत. परंतु, बारामतीमध्ये विजय शिवतारे यांच्या विधानामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. अजित पवार यांच्याबाबत अतिशय चुकीची विधाने त्यांच्याकडून केली जात आहेत. त्यांच्या विधानामुळे महायुतीला तडा जात आहे.
राष्ट्रवादीचा मावळच्या जागेवर दावा आहे. परंतु, महायुतीत ही जागा शिवसेनेला गेली आणि शिवतारे यांची अशीच भूमिका राहिली, तर मावळमध्ये शिवसेना उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेणार आहोत. शिवतारे माफी मागत नाहीत तोपर्यंत आम्ही मावळमध्ये शिवसेना उमेदवाराचा प्रचार करणार नाही. राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अशीच भूमिका घेतील. शिवतारे यांनी माफी मागितल्यास मावळमध्ये युतीचा धर्म पाळला जाईल. बारामती लोकसभा मतदारसंघातील जनता अजित पवार यांच्यासोबत आहे. त्यांनी बारामतीत मोठी विकासकामे केली आहेत. त्यामुळे बारामतीत आमचा उमेदवार निवडून येईल, याची आम्हाला खात्री आहे, असाही दावा गव्हाणे यांनी केला.
सुनेत्रा पवार, शरद पवारांनंतर आता शिवतारेंचा डाव; पवारांचे विरोधक कुणाला देणार बारामतीचा ‘ताज’
“बारामती लोकसभा मतदारसंघ कोणाचा सातबारा नाही. आता बदला घेण्याची वेळ आलीय… अजितदादांची गुर्मी जाणार नाही… आता माघार घेणार नाही… अशी एकापेक्षा एक आक्रमक विधान करत विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे टेन्शन वाढले आहे. शिवतारे यांच्या या शड्डूला जुन्या वादाची किनार असली तरीही यंदा बारामतीमध्ये शरद पवार यांना पराभूत करायचे असल्याने हा वाद मिटविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील अशा सगळ्या नेत्यांनी मध्यस्थी केली. पण शिवतारे माघार घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे आता मावळमध्ये काम न करण्याचा इशारा देऊन शिवतारे यांना बारामतीध्ये शांत करण्याचे नियोजन असल्याचे दिसून येते आहे.