सांगली : काँग्रेस आणि ठाकरे गटात सांगलीच्या जागेवरून मिठाचा खडा पडला असून, काल (दि.25) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांनी मेळाव्यातून विशाल पाटील, विश्वजीत कदम यांच्यासह कार्यकर्त्यांच्या मनातील भूमिका जाणून घेतल्या. यावेळी पटोलेंनी विशाल पाटलांवरील पक्ष करवाईबाबत भाष्य केले. त्यानंतर आता विशाल पाटलांनी (Vishal Patil) कारवाईच्या पत्रावर सही करणाऱ्या व्यक्तीने नीट विचार करावा आणि मगच सही करावी असे म्हणत थेट थेट दिल्लीशी पंगा घेतला आहे.
कारवाईबाबत काय म्हणाले पटोले
सांगलीत विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज भरल्याने त्यांच्यावर पक्षाकडून कारवाईचे संकेत दिले जात आहेत. मात्र, अद्यापपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. यावर बोलताना नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, पदाधिकारऱ्यांशी चर्चा करून विशाल पाटील यांच्याबाबत अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालावर दिल्लीत कारवाईचा निर्णय होणार असल्याचे पटोलेंनी सांगितले. त्यामुळे आता दिल्लीतून विशाल पाटलांवर नेमकी कोणती कारवाई केली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वरिष्ठांची पाठ फिरताच विशाल पाटलांनी घेतला पंगा
पटोलेंच्या या विधानावर विशाल पाटील प्रतिक्रिया देताना म्हणाले की, काँग्रेसवर अन्याय झाला आहे, म्हणून कार्यकर्ते चिडले आहेत. मी कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याचे आवाहन केले असून, पक्षाच्या विचाराच्या विरोधात मी वाागणून केलेली नाही. तसेच मी पक्षाचा कोणताही नियम तोडलेला नाही. काँग्रेसच्या अडचणीच्या काळात आमच्या घराण्याने काम केले असून, वसंतदादांच्या नेतृत्वात जास्त खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे माझ्यावर कोणतीही कारवाई करायची असेल आणि तसे पत्र तयार असेल तर, त्यावर सही करणाऱ्याने कॉन्ट्रीब्युशन हे आमच्या घरापेक्षा जास्त आहे का? हे दाहावेळा विचार करून पाहावं आणि नंतरचं सही करावी. आम्ही विश्वजीत कदम यांनाच नेता मानतो. निवडणूक झाल्यानंतर आम्ही त्यांच्या नेतृत्वातच काम करणार असल्याचेही यावेळी विशाल पाटील म्हणाले.
सांगली काँग्रेसनं का सोडली? पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, तीन पक्षांच्या आघाडीत…
चव्हाण, पटोले, थोरातांपुढे विश्वजीत कदम गरजले
दोन महिन्यांपासून जागेसाठी हेलपाटे घालत होतो. कोल्हापूरमध्ये (Kolhapur) शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhtrapati) हे जो पक्ष सांगतील त्या पक्षाला ती जागा द्यायची, असे ठरलेले असताना कोल्हापूर आणि सांगलीचा संबंध येतो कुठे? असे असतानाही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सांगलीत येतात काय आणि उमेदवारीची घोषणा करतात काय… मित्रपक्षांमध्ये असे होते का? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे होते का? असे सवाल करत काँग्रेस नेते आणि आमदार विश्वजीत कदम यांनी राज्यातील ज्येष्ठ नेत्यांना कार्यकर्त्यांसमोरच सांगलीची जागा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला कशी गेली असा जाब विचारला.